'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 03:31 PM2023-01-08T15:31:53+5:302023-01-08T15:32:00+5:30
'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.'
औरंगाबाद: सीमाप्रश्नासह विविध मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राज्यातील शिंदे सरकारवर खोचक टीका केली. यावेळी पवारांनी सरकारला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्लाही दिला. पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांना प्रत्युत्तर
आज देवेंद्र फडणवीसऔरंगाबाद शहरातील ऑरिक सिटीमध्ये भरवण्यात आलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आले आहेत. दरम्यान, विमानतळावर माध्यमांनी त्यांना शरद पवारांच्या टीकेबाबात विचारणा केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे', असे प्रत्युत्तर फडणवीसांनी शरद पवारांना दिलं.
सीमाप्रश्नी सरकार गंभीर
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरही भाष्य केलं. सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर फडणवीस म्हणाले, 'सीमाप्रश्नी सरकार खूप गंभीर आहे. आम्ही हरीश साळवेंशी संपर्क साधला आहे, ते आपली केस मांडतील अशी मला आशा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत आहे', असं फडणवीस म्हणाले.
सामना पेपर नाही
दरम्यान, फडणवीसांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावरही खोचक टीका केली. सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर उत्तर देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. 'सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही', असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
काय म्हणले होते शरद पवार?
'सत्ता हातात आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन.. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण, इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली,' असं शरद पवार म्हणाले होते.