हैदराबाद जवळील अपघातामुळे देवगिरी एक्सप्रेस रद्द ; अनेक रेल्वेवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 04:51 PM2017-12-23T16:51:13+5:302017-12-23T16:52:02+5:30
तिरुपती-निजामाबाद रेल्वे निजामाबादजवळ शनिवारी रुळावरून घसरल्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेवर परिणाम झाला आहे.
औरंगाबाद/ परभणी : तिरुपती-निजामाबाद रेल्वे निजामाबादजवळ शनिवारी रुळावरून घसरल्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेवर परिणाम झाला आहे. मुंबईहून सिंकदाराबादकडे जाणारी एक्स्प्रेस परळीमार्गे वळविण्यात आली आहे. तर सिंकदराबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे.
२३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तिरुपती -निजामाबाद या रॉयलसीमा एक्सप्रेसचा एक डबा रुळावरुन घसरला. ही घटना कामारेड्डी- निजामाबाद दरम्यान घडली आहे. या अपघाताचा परिणाम परभणी जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीवरही झाला असून रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद ते मुंबई (१७०५८) ही देवगिरी एक्सप्रेस आज रद्द केली. त्याच प्रमाणे मुंबई ते सिकंदराबाद (१७०५७) देवगिरी एक्सप्रेस गाडी परळी- विकाराबादमार्गे वळविण्यात आली. संबळपूर-नांदेड एक्सप्रेस (२०८०९) विकाराबाद -परळी- परभणीमार्गे नांदेडकडे जाईल. काही रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात काचीकुडा ते मनमाड ही पॅसेंजर कामारेड्डी ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच निजामाबाद ते मेदचल दरम्यान या मार्गावरील ५७५९३ आणि ५७५९४ ही पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती नांदेड येथील रेल्वे विभागाने दिली.