भाविक परतीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:13 AM2017-11-05T01:13:30+5:302017-11-05T01:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते. येथील संत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते. येथील संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविक कपीलधारमध्ये दिंड्यांसह दाखल झाले होते. शुक्रवारी महापूजेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात भक्तीचा महापूर होता. दरम्यान, शनिवारी सर्व भाविक समाधीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या दिशेने निघाले होते. यावेळी ‘हर हर महादेव.., गुरुराज माऊली, मन्मथ माऊली’चा जयघोष कानी पडत होता.
श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रत्येक वर्षी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस यात्रा भरत असते. राज्यासह परराज्यातील जवळपास ६५ पेक्षा जास्त दिंड्यासह वाहनांमधून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांचे हाल होणार नाहीत, यासाठी संस्थानच्या वतीने पूर्ण नियोजन केले जाते. यावर्षीही संस्थानकडून सुरळीत आणि लवकर दर्शन व्हावे, यासाठी नियोजन केल्याचे दिसून आले. शुक्रवारी शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिंडीचे आगमन झाले. त्यानंतर रात्री दहा ते १२ या वेळेत धर्मसभा झाली. यावेळी शिवाचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, शुक्रवारी जवळपास ५० च्यावर दिंड्या कपीलधारमध्ये आल्या होत्या. शनिवारी चितळी पुतळी, हातगाव, जिंतूर इ. ठिकाणच्या दिंड्या कपिलधारमध्ये आल्या. दर्शन, महाप्रसाद घेतल्यानंतर त्या सायंकाळी परतीच्या दिशेने निघाल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांच्या नाश्ता व चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवस चाललेला हा यात्रोत्सव शांततेत पार पडला.
तीन संशयित ताब्यात
गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात कारवाईही केल्याचे बल्लाळ म्हणाले.