भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:34 PM2022-09-14T14:34:15+5:302022-09-14T14:34:57+5:30

शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे.

devotees and disciples decided; Shantigiri Maharaj will enter the election arena again ! | भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

googlenewsNext

- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद :
जनार्दन महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असून, तसे झाल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

यापूर्वी २००९मध्ये त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा लढविली होती. त्या निवडणुकीत एक लाख ४८ हजार मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतीगिरी महाराज रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली होती. त्या निवडणुकीत खैरे यांचा केवळ ३३ हजार १४ मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वीच्या, २००४ च्या निवडणुकीत खैरे यांना ५२.४ टक्के मते मिळाली होती, मात्र शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे २००९च्या निवडणुकीत खैरे यांच्या मतांची टक्केवारी ४२.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. शांतीगिरी महाराजांचे वलय २००९च्या निवडणुकीनंतर वाढत गेले. त्यांना राज्यातील विविध पक्षांची बडी मंडळी भेटायला जाऊ लागली.
स्थानिक नेते तर त्यांना भेटतच असतात, परंतु छत्रपती संभाजी राजे, तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी मंडळीही त्यांना भेटून गेलेली आहे. नजीकच्या काळात विश्वशांती संमेलन आयोजित करण्यात येणार असून, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा मानस आहे.

शिष्यांनीच ठरवले आहे...
महाराजांच्या वेरूळ येथील आश्रमात एका भेटीत ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात, ही बाब स्पष्ट झाली. शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे. त्यातही औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. १०८ आश्रम, दहा गुरुकुल, शेकडो एकर जमीन असा मोठा व्याप आहे. श्रमदानाला प्रचंड महत्त्व देणारे शांतिगिरी महाराज म्हणाले, ‘मी निवडणूक लढवतो की नाही, यापेक्षा आमच्या भक्त, भाविकांनी व शिष्यांनीच तसे ठरवले आहे. मागच्या काही निवडणुकांमध्ये आम्ही अनेक उमेदवारांना भरपूर मदत केली आहे. हे पाहता खरे तर आम्हाला बिनविरोधच संसदेत पाठवायला हवे. तेथे जाऊन आम्हाला देशाची सेवा करायची आहे. जनतेची नि:स्वार्थ सेवा करायची आहे.’

औरंगाबाद किंवा नाशिक
मतदारसंघ अद्याप निश्चित केला नाही. औरंगाबाद किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ निवडला जाईल. शिष्यगण नाशिकला अधिक प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांतीगिरी महाराजांनी प्रशंसा केली. परमात्माच त्यांच्याकरवी चांगली कामे करवून घेत आहे, असे मला तरी वाटते. राममंदिर होईल, ही स्वप्नपूर्ती त्यांच्यामुळे शक्य होत आहे. ३७० कलम त्यांच्या भूमिकेमुळे हटले. आता त्यांनी समान नागरी कायदा करून टाकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे...
परधन, परस्त्री, परनिंदा व परअन्न यांचा त्याग करण्याची गरज आहे. आज नेमके याच्या विरुद्ध घडत आहे, याबद्दलची चिंता महाराजांनी व्यक्त केली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वानुसार आज जो वागतोय, तो खरा हिंदुत्ववादी.’ महाराजांचा हा सूचक इशारा फार बोलका आहे.

Web Title: devotees and disciples decided; Shantigiri Maharaj will enter the election arena again !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.