त्रिवार जयजयकार! श्रीलंकेतून आलेल्या श्रीराम, सीताच्या पादुकांसमोर भाविक नतमस्तक
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 29, 2023 12:38 PM2023-12-29T12:38:19+5:302023-12-29T12:38:19+5:30
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी ‘रामराज्य युवा यात्रा’ १५ डिसेंबरला काढण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : ‘त्रिवार जयजयकार रामा, त्रिावर जयजयकार, तुला चिंतिते सुदीर्घ आयु... पुलकित पृथ्वी, पुलकित वायू, आज जाहले छत्रपती संभाजीनगर उद्धार’.... जेव्हा रावणाचा वध करून, विजयी होऊन श्रीराम सीताला सन्मानपूवर्क पुष्पक यानातून आणतात. तेव्हा अयोध्येत जो आनंदोत्सव होतो, त्याचे वर्णन ‘गीतरामायणा’मधील गाण्यात केले आहे. त्याच गाण्याची आज सर्वांना आठवण झाली... जेव्हा श्रीलंकेतून प्रभू श्रीराम व सीता यांच्या पादुका शहरात आणल्या तेव्हा सर्व भाविक नतमस्तक झाले.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी ‘रामराज्य युवा यात्रा’ १५ डिसेंबरला काढण्यात आली. श्रीलंकेतील अशोक वाटीकेतून यात्रेला सुरुवात झाली. आणि श्रीराम वनवास काळात जिथे जिथे गेले त्या भागातून ही यात्रा जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता क्रांती चौकात पोहोचली. तेव्हा सर्वांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ असा गगनभेदी जयघोष केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सर्वांचे स्वागत केले. सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने ही यात्रा निघाली.
सजविलेल्या रथात समोरील बाजूस प्रभू श्रीरामाच्या पादुका, तर पाठीमागील सजविलेल्या रथात ‘सीता माते’च्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. इतर रथांमध्ये साधू-संत विराजमान होते. भगवा ध्वज हातात घेऊन युवक, महिला ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयजयकार करीत होते. ढोल पथकाच्या दणदणाटात यात्रा पुढे सरकरत होती. यात्रा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्याच्या आजूबाजूला शेकडो भाविक उभे होते. जसे श्रीरामाची पादुका असलेले रथ जवळ येत तेव्हा इमारतींवरून पुष्पवृष्टी केली जात होती. सर्व जण आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात पादुकांचे फोटो काढत होते. नूतन कॉलनी, पैठण गेट, टिळकपथ मार्गे रात्री ७:३५ वाजता गुलमंडीवर यात्रा पोहोचली. यावेळी व्यासपीठावर यात्रेचे मार्गदर्शक डॉ. राम अवतार शर्मा महाराज, भारतानंद सरस्वती महाराज, गणेश रामदासी महाराज यांच्यासह आ. प्रदीप जैस्वाल, विहिंपचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे, हर्षवर्धन कराड, महावीर पाटणीसह समितीचे सर्व पदाधिकारी हजर होते.
२ हजार लोकांना अयोध्येत नेणार
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तिथून प्रत्येक जिल्ह्याला तारीख देणार आहेत. आपल्या जिल्ह्याला आमंत्रण देण्यात येईल तेव्हा येथून २ हजार भाविकांना अयोध्येत नेण्यात येणार आहे. तसेच, ५ लाख हनुमान चालिसा घरोघरी वाटण्यात येणार आहेत.
- डॉ. भागवत कराड,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
मंदिर संरक्षणाची जबाबदारी सर्वांची
अयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मात्र, आता या मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यासाठी प्रत्येक राम भक्ताला सज्ज व्हावे लागणार आहे.
- डॉ. राम अवतार शर्मा,यात्रा मार्गदर्शक