यात्रेत ‘गळ खेळून’ भक्तांनी फेडले नवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:26 AM2018-04-05T00:26:03+5:302018-04-05T00:29:31+5:30
जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.
श्रीकांत पोफळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रा : जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.
शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. प्रशासनाच्या बंदीनंतरही यंदाही यात्रेच्या चित्रात व स्वरूपात काहीही बदल नव्हता. हातात बकरू व काखेत लेकरू घेऊन गळ टोचून नवस फेडणाºया भाविकांची यात्रेत रांग लागली
होती.
हळद व मळवट भरून नवरदेवाचे रूप घेऊन नवस फेडणाºया व्यक्ती व महिला ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत गळ टोचून घेत होत्या. भाविक तेथून किमान दोनशे फूट धावत जाऊन मंदिरासमोर नतमस्तक होत होते. रेवड्यांची उधळण करीत बाबांच्या जयघोषाने मंदिर परिसरात भाविकांत उत्साह संचारला
होता.
उन्हाचा पारा आग ओकू लागल्याने जालना रोडपासून ते मंदिरापर्यंत ग्रामस्थ पाणी पाऊच वाटत होते. त्यामुळे भाविकांना पाणीटंचाई जाणवत नव्हती. मंदिराच्या शेजारी देवस्थान समितीचे कार्यालय असून, समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते. यात्रेत नियोजनासाठी समितीच्या वतीने ५० स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कोठेही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे परिश्रम घेत होते. मंदिर परिसरात रोडवर मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पहाटेपासूनच गर्दी, कोंबड्या-बकºयांचा बळी
पहाटेपासूनच नवस फेडणारे भाविक अनवाणी पायाने मंदिराकडे जात होते. भाविक महिला व पुरुष डफाच्या तालावर वाजतगाजत कापडाचा मांडव डोक्यावर धरून पूजेचे साहित्य घेऊन जात होते.
काही भक्त तर लोटांगण घालत मंदिराकडे दर्शनाला जात होते. मारुती मंदिरासमोर कंबरेला गळ टोचल्यानंतर साधारण दोनशे फूट पळत जाऊन गळ काढल्यानंतर मांगीरबाबाचरणी नतमस्तक होऊन कंदुरीकडे जात होते.
यात्रेत जनजागृतीमुळे गळाचे प्रमाण निम्म्याने घटले असून, पहिल्या दिवशी १,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी देण्यात आला.
१,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी.
जनजागृतीमुळे गळ निम्म्याने घटल्याचे देवस्थान व ग्रामपंचायतीचा दावा.
गळ टोचायला विरोध करताना भाविक व देवस्थान समितीत वाद. ग्रामस्थांच्या मागणीमुळे व त्यांच्या सुरक्षेसाठी समितीची माघार.
गळ टोचणीच्या ठिकाणी त्यावेळी पोलीस किंवा प्रशासनाचा एकही कर्मचारी, अधिकाºयाची उपस्थिती नव्हती.
यावर्षी चतुर्थी दोन दिवस असल्यामुळे येणारा समाज दोन दिवसांत विभागला गेला. त्यामुळे बुधवारी भाविकांची संख्या कमी असल्याचे समितीने कळविले.