घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:44 PM2024-08-05T19:44:02+5:302024-08-05T19:51:51+5:30
श्रावण महिन्याचा प्रारंभच सोमवारपासून सुरू झाल्याचा योगायोग ७७ वर्षानंतर आला आहे.
- सुनील घोडके
खुलताबाद: हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण मास आजपासून सुरू झाला असून पहिल्याच श्रावणी सोमवारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
श्रावण महिन्याचा प्रारंभच सोमवारपासून सुरू झाल्याचा योगायोग ७७ वर्षानंतर आला आहे. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली होती. पहाटे सहापासून चांगली गर्दी झाल्याने मंदीराच्या आतमधील दर्शनरांग फुल झाली होती. श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांना सकाळी ४ ते ६ दरम्यान सोडण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरहून भाविकाच्या सोयीसाठी जादा सिटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभर सिटीबसेसला मोठी गर्दी असल्याचे चित्र होते. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आला होता. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला #ShrawanSomvar#shravanmaas#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/WumlUjR8hU
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 5, 2024
दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या दरम्यान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी कुटूंबियांसोबत दर्शन घेतले होते. देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांची यावेळी उपस्थिती होती. वेरूळनगरी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने दुमदमले होते. हर हर महादेव, श्री घृष्णेश्वर भगवान की जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. श्रावणी सोमवार निमित्त मंदीर परिसरात मोठ्या बेल व पानफुल व प्रसादाची विक्री झाली. मंदीर परिसराला आज यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक भाविकांनी दर्शनानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत जावून पर्यटनाचा आनंद घेतला.