५०० वर्ष जुनी मूर्ती, निद्रिस्त गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ; कुठे आहे? कसे जाणार?
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 27, 2023 05:13 PM2023-09-27T17:13:28+5:302023-09-27T17:13:56+5:30
भद्रा मारुतीसारखा चक्क झोपलेला गणपती; भाविकांचा मोठ्याप्रमाणात ओढा
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथे झोपलेल्या अवस्थेतील भद्रा मारुतीची मूर्ती सर्वांनाच ठाऊक आहे, अगदी तशीच गणपतीची मूर्तीसुद्धा छत्रपती संभाजीनगरापासून अवघ्या ८२ किमी अंतरावरील आव्हाणे (पैठणजवळ) येथील मंदिरामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल, ‘हे काय नवीन’? येथील निद्रिस्त गणपतीची मूर्ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे बोलले जाते. अलीकडेच या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे.
पैठणपासून ३० किमी तर शेवगावपासून अवघ्या १३ किमी अंतरावर आव्हाणे (बुद्रुक) नावाचे खेडे आहे. या शांत व निसर्गरम्य वातावरणात निद्रिस्त अवस्थेतील गणेशाची दक्षिणमुखी मूर्ती आहे. मंदिरात जमिनीपासून तीन फूट खोल असलेली आणि तीन बाय अडीच फुटांची व शेंदरी रंगातील गणरायाची मूर्ती दिसते. मूर्तीच्या वरच्या बाजूस काचेचे तावदान आहे. मूर्ती दिसण्यासाठी आता छोटासा लाइटही बसविण्यात आला आहे.
येथील पुजारी प्रदीप भालेराव यांनी सांगितले की, दादोबा देव हे गणेशभक्त होते. दरवर्षी ते मोरेगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाला पायी जात. त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र गणोबा देव हे शेतात नांगरणी करताना नांगराचा फाळ एका वस्तूला अडला. उकरल्यावर एक स्वयंभू गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती दिसली. ही घटना ५०० वर्षे जुनी आहे. त्याच ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे.
१९ वर्षांपूर्वीच शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेश
राज्य सरकारने २००५ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्राच्या यादीत केला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तेव्हा ४४ लाख रुपये शासनाने दिले होते. त्यातून गावकऱ्यांनी मिळून चिरेबंदी भव्य मंदिर उभारले आहे.
एकाच गाभाऱ्यात गणेशाची तीन वेगवेगळी रूपे
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच गाभाऱ्यात गणेशाची तीन वेगवेगळी रूपे बघण्यास मिळतात. निद्रिस्त गणपती, त्या पाठीमागील बाजूस मोरेश्वराची मूर्ती व बाजूलाही शेंदूरवर्णीय गणपतीची मूर्ती अशा तीन मूर्तींचे दर्शन एकाच ठिकाणी होते.