धावत्या रेल्वेतून कुटुंबाने मारली उडी, गर्भवती महिलेसह चिमुकली जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:10 AM2017-07-30T01:10:59+5:302017-07-30T01:10:59+5:30
औरंगाबाद : अमृतसरकडे जाणाºया सचखंड एक्स्प्रेसमध्ये चुकून बसल्याचे लक्षात येताच पती-पत्नीने चिमुकलीसह धावत्या रेल्वेतून उडी मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अमृतसरकडे जाणाºया सचखंड एक्स्प्रेसमध्ये चुकून बसल्याचे लक्षात येताच पती-पत्नीने चिमुकलीसह धावत्या रेल्वेतून उडी मारली. या घटनेत गर्भवती महिलेसह दोन वर्षांची चिमुकली जखमी झाली. लोहमार्ग पोलिसांनी शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने घाटीत दाखल केले. ही धक्कादायक घटना औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवारी (दि. २९) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली.
कविता महेश भंडारवाल (२३) आणि पूनम भंडारवाल (२ वर्षे) असे जखमी माय-लेकीचे नाव आहे. याविषयी माहिती अशी की, कासोदा येथील महेश भंडारवाल हे कुटुंबासह नांदेड येथे जाण्यासाठी शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आले. नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस येत असल्याची घोषणा होताच अमृतसरकडे जाण्यासाठी प्रवासी संबंधित प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिले.
महेश, कविता चिमुकल्या पूनमसह त्याच प्लॅटफॉर्मवर गेले. रेल्वे येताच अन्य प्रवाशांसोबत भंडारवाल दाम्पत्यही गाडीत बसले. पुढील प्रवासासाठी गाडी निघाली तेव्हा आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांच्याकडील दोन्ही पिशव्या हातात घेऊन महेशने रेल्वेतून उडी मारली.
गाडीचा वेग हळूहळू वाढत असल्याचे पाहून कविताने पूनमला घेऊन पटकन रेल्वेतून उडी मारावी यासाठी महेश रेल्वेसोबत पळत होता. तो सारखा तिला आवाज देऊन उडी मारण्याचे सांगत होता.
कविताने पूनमला एका हाताने घट्ट आवळून धावत्या रेल्वेतून उडी मारली. एखाद्या सिनेमाला लाजवील अशा थरारक घटनेत पूनमसह सात महिन्यांची गर्भवती असलेल्या कविताने रेल्वेतून उडी घेतली. त्यात दोघींच्या डोक्याला मार लागला.
महेशसह अन्य लोकांनी आरडाओरड केल्याने रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी आणि लोहमार्ग ठाण्याचे निरीक्षक भगवान कांबळे, उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे, पोलीस कर्मचारी धनराज गडलिंगे, हरिभाऊ स्वप्ने, श्वेता दमके, शिवसेना कार्यकर्ते ईश्वर रेड्डी यांनी धावपळ करीत रुग्णवाहिकेतून या कुटुंबाला तात्काळ घाटीत दाखल केले.
या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली.