शांतीदूतापुढे लाखो नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:43 AM2017-10-01T00:43:20+5:302017-10-01T00:43:20+5:30
शांतीदूताच्या वैभवशाली बुद्धलेणी, धम्मभूमीला शनिवारी नागपूरच्या प्रति दीक्षाभूमीचेच स्वरूप आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शांतीदूताच्या वैभवशाली बुद्धलेणी, धम्मभूमीला शनिवारी नागपूरच्या प्रति दीक्षाभूमीचेच स्वरूप आले. मराठवाड्यातील आठही जिल्हे, खान्देशासह नगरमधूनही लाखो उपासक-उपासिका ‘जब तक सूरज चाँद रहेगा- बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणा देत येत होते. सकाळी सात वाजता सुरू झालेला हा धम्म सोहळा रात्री बारा वाजले तरी सुरूच होता.
६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त धम्मध्वजारोहण व बुद्धवंदनेने सकाळी सोहळ्यास प्रारंभ झाला. या परिसरात तथागताच्या शेकडो मूर्ती स्थापित आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी बुद्धवंदनेचा मंगलमय सूर दिवसभर घुमत होता. दुपारपर्यंत सामान्य असलेली गर्दी तीन वाजेनंतर मात्र प्रचंड वाढली. त्यामुळे पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वाहने पुढे नेण्यास बंदी केली. पुढे पायी चालणेही अवघड होईल एवढी गर्दी झाली होती. पांढरे शुभ्र वस्त्र, डोईवर निळा फेटा किंवा गमच्या, हाती पंचशील झेंडा घेऊन आबालवृद्ध घोषणा देत होते. अनेक लहान-लहान गट रस्त्याने बुद्धवंदना म्हणत पुढे सरकत होते. त्यामुळे वातावरण मंगलमय झाले होते. तर विद्यापीठाचा हिरवाकंच परिसर, त्यात जागोजागी भरलेले पाण्याचे तळे जनसागराचा उत्साह वाढवीत होते.
बुद्धलेणीच्या पायथ्याशी विहारातील भव्य बुद्धमूर्तीपुढे लीन होऊन अपार शांतीचा अनुभव घेतल्यानंतर येथे उभारलेल्या शामियान्यात उपासक बसत होते. मंचावर भदन्त विशुद्धानंद बोधी, प्रा. भंते सत्यपाल, भदन्त सुदत्त बोधी, गुणरत्न महाथेरो, भदन्त नागसेन यांच्यासह भिक्खू व श्रामणेर संघ विराजमान होता. या उपासक- उपासिकांना भिक्खू संघातर्फे धम्मदीक्षा दिली जात होती. सोबतच कलावंतांचा संच बुद्ध-भीमगीते गाऊन प्रबोधन करीत होता. या वैचारिक प्रबोधनाला टाळ्यांसह साधूकाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दिवसभर अशी जुगलबंदी रंगत होती. दिवसभरात पाच लाखांहून अधिक उपासक- उपासिका धम्मसोहळ्यास आल्याचे भदन्त सुदत्त यांनी सांगितले.
महापौर, आमदार, आयुक्तांची उपस्थिती
महापौर बापू घडमोडे, आमदार सुभाष झांबड, आमदार इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिवसभरात या सोहळ्यास भेट दिली. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष विजय मगरे, कार्याध्यक्ष वसंत सातदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छा
या सोहळ्यास लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलत मोरे यांनी मंचावरून राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छा उपस्थिताना कळविल्या. ते म्हणाले, राजेंद्र दर्डा यांना लेणीवर आज यायचे होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी तमाम बौद्ध उपासक-उपासिकांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा कळविल्या आहेत.