दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:37 AM2017-09-25T00:37:16+5:302017-09-25T00:37:16+5:30
बुद्धलेणीच्या पायथ्याशी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दहा देशांतील बौद्ध भिक्खू उपस्थित राहतील
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बुद्धलेणीच्या पायथ्याशी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दहा देशांतील बौद्ध भिक्खू उपस्थित राहतील, अशी माहिती भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या ठिकाणी दरवर्षी अशोक विजयादशमीनिमित्त दहा दिवस श्रामणेर शिबीर आणि दहाव्या दिवशी मोठा समारंभ आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर येथे पिण्याचे पाणी, पथदिवे, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी अनेकदा महापालिकेकडे मागणी केली; परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंत भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरालगत बुद्धलेणीच्या पायथ्याशी प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्र आहे. या केंद्रामध्ये अनेक कुटींमध्ये बौद्ध भिक्खू निवास करतात. येथे मोठे विपश्यना केंद्रही आहे. याठिकाणी रोज मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांतून हजारो उपासक- उपासिका भेट देत असतात. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथे सलग दहा दिवस श्रामणेर शिबीर घेण्यात येते. शिबिरात यंदा ६० जणांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली असून, त्यांना रोज ध्यान साधना, बौद्ध धम्माच्या संस्कृतीची शिकवण दिली जाते. यंदा याठिकाणी अशोक विजयादशमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता कोलकाता आणि अहमदनगर येथील १२ कुटुंबांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाणार आहे. या परिस्थितीत येथे पायभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. यासाठी मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.