धम्म संस्कार बुद्ध नियमानेच करा; त्यासाठी प्रशिक्षण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:46 PM2018-05-21T16:46:05+5:302018-05-21T16:47:09+5:30
धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले.
औरंगाबाद : धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे डॉ. अशोक गायकवाड यांच्या हस्ते धम्म शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी भदंत आनंद होते. यावेळी भदंत विमलकित्ती गुणसिरी म्हणाले, कोणत्या संस्काराला कोणता विधी, तसेच पाली भाषेचे उच्चारण कसे करावे, बुद्ध धम्माची शिकवण याविषयी काहीही माहिती नसताना सध्या कोणीही अप्रशिक्षित व्यक्ती अपूर्ण गाथा घेतात. ७० वर्षांनंतरही आपणास अभ्यासपूर्ण धम्म संस्कार देता येत नाही. आपल्यातील संवाद व समन्वयाअभावी बुद्ध, फुले, आंबेडकर चळवळीला पदोपदी गतिरोधकाला सामोरे जावे लागत आहे. भारत बौद्धमय करण्याचे मिशन गतिमान करण्यासाठी प्राज्ञजन परिषदेने धम्म प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.
शहरातील बौद्ध उपासक, समता सैनिक दलाचे पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन सत्रात शिबीर घेण्यात आले. पहिल्या सत्रात ‘धम्मदीक्षा आणि नामांतर अनिवार्य’या विषयावर व्याख्यान व नंतर प्रश्नोत्तरात उपासकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी पी. आर. कांबळे, संघराज धम्मकित्ती,व्ही. एम. परधने, अॅड. हर्षवर्धन प्रधान, प्रकाश ससाने आदींसह संयोजकांनी परिश्रम घेतले. संघराज धम्मकित्ती यांनी सूत्रसंचालन केले. विलास सिरसाट यांनी आभार मानले.