औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:09 AM2018-05-16T01:09:18+5:302018-05-16T01:09:43+5:30

औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.

Dhananjay Munde blames Shivsena-BJP leaders and police for riot | औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.
मुंडे यांनी दुपारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी सांगितले की, माझी पक्की माहिती आहे की, दंगल होणार असल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांना अडीच महिन्यांपूर्वी अहवाल दिला गेला होता. परंतु वरीष्ठ अधिका-यांनी ही माहिती दडवली. या अहवालाची दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती, तर कदाचित ही दंगलही टळली असती. गुप्तचर खात्याचा अहवाल दाबणा-या त्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. औरंगाबादची दंगल हे गृहखात्याचे अपयश होय. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे सांगत मुंडे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या खासदारांवर केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले. तसेच एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जायला रस्ता नाही म्हणून वाटेतील दुकाने या दंगलीत जाळण्यात आली. शहराचे काहीही वाटोळे होवो पण आमचा वैयक्तिक स्वार्थ साधला गेला पाहिजे, या भूमिकेतून औरंगाबादची दंगल पेटवण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किशनचंद तनवाणी असे या माजी आमदाराचे नावही मुंडे यांनी घेतले. दंगल पेटलेली असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते वागले. पोलिसांचा म्हणून एक दबदबा असतो, तो औरंगाबादेत दिसला नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी नोंदवली.
येथून पुढे निवडणुकांवर डोळा ठेवून राज्यात दंगली घडवून आणल्या जातील, असे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले होते. ते आता खरे वाटू लागले आहे, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली.
पत्रपरिषदेस आ. सतीश चव्हाण, कदीर मौलाना, कमाल फारुकी, इलियास किरमानी, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, विनोद बनकर, ख्वाजा शरफोद्दीन आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dhananjay Munde blames Shivsena-BJP leaders and police for riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.