'रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते, सोबत वाल्मीक कराडही'; जरांगे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:38 IST2025-02-04T05:37:41+5:302025-02-04T05:38:16+5:30
सलग पाच दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. ३१ जानेवारीपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते, सोबत वाल्मीक कराडही'; जरांगे यांचा गौप्यस्फोट
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे अंतरवाली सराटी येथे आपल्याला भेटायला आले होते, त्यांच्यासोबत वाल्मीक कराडही होता, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांसमोर केला.
सलग पाच दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. ३१ जानेवारीपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना यंत्रणा सोडणार नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला मंत्री धनंजय मुंडे हे लपवत आहेत.
धनंजय मुंडे तुम्हाला यापूर्वी कधी भेटले होते, असे विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी रात्री दोन वाजता ते मला भेटण्यासाठी आले होते. मी भेटायला तयार नव्हतो. पण बराच वेळ ते थांबल्याने माणुसकी म्हणून भेटलो. तेव्हा ते ‘मला सांभाळा’ असे म्हणाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
तेव्हा सोबत असलेल्या वाल्मीक कराडची ओळख करून दिली. हा कराड आहे का? शेतकऱ्यांच्या हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा हाच का, असे मी विचारताच तो बाहेर निघून गेला. नंतर मुंडे यांनी मराठ्यांनी मला मोठे केल्याचे म्हणत जाताना पाया पडल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला.