धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:14 PM2024-10-02T14:14:34+5:302024-10-02T14:20:19+5:30
स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मराठवाड्यात ४७ जागा लढण्याचे जाहीर केले
छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे हे पांढरपेशी गुंड असून मी त्यांच्याविरुद्ध परळी विधानसभा मतदारसंघात लढणार आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रपरिषदेत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी दिली.
पत्रपरिषद आटोपल्यानंतर त्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या. परळीत एवढी दहशत आहे की, तिथले पत्रकार पत्रपरिषदेलाही येत नाहीत. म्हणून मला छत्रपती संभाजीनगरात येऊन बोलावे लागत आहे, असे त्यांनी नमूद केले.
परळीत हाणामाऱ्या, खून, दडपशाही सुरू आहे. बायकोला घराबाहेर काढताहेत. शेतकरी व व्यापारी परळी सोडून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. एकट्या परळीमधूनच नाही तर मी बीडमधूनही अर्ज भरणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी परळीत काम करून दाखवलंय. म्हणून मतदान मागते.
माझ्या जीवाला धोका
धनंजय मुंडे वंजारी समाजावरही अन्याय करीत आहेत. २००१ मध्ये त्यांनी तिथली गुंडगिरी मोडून काढली. आता तेच तिथे दडपशाही व गुंडगिरी करीत आहेत. माझ्या जिवाला धोका आहे. आठ महिन्यांपूर्वी मला मारहाण झाली होती. मागे मी ४५ दिवस तुरुंगात राहिली. तिथेच माझ्या मनात क्रांतीची ठिणगी पडली, असे त्या म्हणाल्या.
मराठवाड्यात ४७ जागा लढणार
मुंडे आज सत्ताधीश आहेत. त्यांच्यासमोर आपला टिकाव कसा लागेल, यावर त्या उद्गारल्या, मी पण छोटी नाही. मुंडे घराण्याची सून आहे. मी लढेन व जिंकेनही. मराठवाड्यात ४७ व पुण्यात दहा जागा स्वराज्य शक्ती सेना लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.