धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:57 AM2024-11-07T11:57:59+5:302024-11-07T12:01:35+5:30

सदर जमिनीचा व्यवहार धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंढे या नोकराच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

Dhananjay Munde's connivance defrauded by selling land worth crores at a low price: Sarangi Mahajan | धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन

धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन

छत्रपती संभाजीनगर : पती प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मधील करोडो रुपये किमतीची ३६.५० आर जमीन धनंजय मुंडे यांच्या संगनमताने धाकदपटशा दाखवून, कारस्थान रचून, जबरदस्तीने अल्प किमतीला घरगड्याच्या माध्यमातून खरेदी करून घेतली. अशाप्रकारे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्र परिषदेत केला.

सदर जमिनीचा व्यवहार धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंढे या नोकराच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी केला. गोविंद माधव मुंढे, तानाजी दशरथ चाटे आणि गोविंद बालाजी मुंढे यांची सून पल्लवी दिलीप गिते यांच्या नावे जमिनीचा व्यवहार करून फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर व्यवहार ठरवून बोलावून घेतले व बोगस रजिस्ट्री करवून घेतली. सदर व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली होती.

सदर जमिनीबाबत धनंजय आणि पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास सतत टाळाटाळ केली. सदर जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड हायवेलगत आहे. यातील २७ आर जमीन शासनाने रस्ते विकास कामासाठी संपादित केली आहे. उर्वरित ३६.५० आर जमिनीचा वरील व्यवहार असल्याचे त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले. यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी परळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात विशेष दावा क्रमांक ६१/२४ त्याच दिवशी दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, २५ नोव्हेंबर रोजी दाव्याची सुनावणी आहे. त्याचप्रमाणे आपण बीडचे पोलिस अधीक्षक आणि पोलिस महासंचालक यांना भेटून तक्रार दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

.... मुदत संपत असल्यामुळे कारवाई
दोन वर्षांपूर्वीच्या व्यवहाराबद्दल ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला असता आपला राजकारणाशी संबंध नाही. माझी दिवाणी दावा दाखल करण्याची ३ वर्षाची मुदत संपत असल्यामुळे आता कारवाई करीत असल्याचे सारंगी म्हणाल्या.

Web Title: Dhananjay Munde's connivance defrauded by selling land worth crores at a low price: Sarangi Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.