धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Published: November 10, 2023 07:13 PM2023-11-10T19:13:28+5:302023-11-10T19:14:09+5:30

या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा

Dhangar, Muslim and Maratha communities share the same pain; Manoj Jarange's call for the three to come together | धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजांचं एकच दुखणं आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

मनोज जरांगे हे शहरातील खाजगी रुग्णालयात २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून उपचार घेत आहेत. आता प्रकृती चांगली होत असल्याने त्यांनी दिवाळीनंतर राज्यात दौरा करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शुक्रवारी सकाळी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, उपोषण सोडताना राज्य सरकारने मराठा समाजाला दोन महिन्यांत आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. हा बॉण्ड जरांगे पाटील यांना देण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. मात्र, चार दिवसांपासून पाटील यांना ’तारीख पे तारीख’ मिळत आहे. 

याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र दोन, तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यस्त असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र मुद्दामहून जर टाळाटाळ करून समाजासोबत टोलवाटोलवी करणार असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. त्यांच्या या मागणीमुळे आताच आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासोबतच अन्य जातीमध्येही कुणबी नोंद आढळत आहेत, त्यांनाही आरक्षण द्यावे का, या प्रश्नाचे उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी द्यावे, असे म्हणून जरांगे यांनी भुजबळ यांना टोला लगावला. जरांगे म्हणाले., ज्यांच्या नोंदी आढळतात, ते सर्व आरक्षणास पात्र आहेत, असे आपले मत आहे.

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे
राज्य सरकार ओबीसी नेत्यांचे खूप लाड पुरवीत आहेत. सरकारने या ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

Web Title: Dhangar, Muslim and Maratha communities share the same pain; Manoj Jarange's call for the three to come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.