धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे एकच दुखणे : मनोज जरांगे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 09:38 AM2023-11-11T09:38:49+5:302023-11-11T09:38:59+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे.

Dhangar, Muslim and Maratha community share the same pain: Manoj Jarange-Patil | धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे एकच दुखणे : मनोज जरांगे-पाटील

धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे एकच दुखणे : मनोज जरांगे-पाटील

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे. याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर  वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.   

केंद्र सरकारने आरक्षण द्यावे : अमित देशमुख
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने आता वेळ न घालवता मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली.

महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा : चव्हाण 
नांदेड : बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले असून, जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.   

सरकारचे दोन्ही दरडींवर पाय : जयंत पाटील 
मुंबई : राज्य सरकारमधील काही लोक ओबीसींना चुचकारत आहेत, तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तुम्ही एका ठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.

भावनेचा आदरच
कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. यामुळे आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटते आहे. 

Web Title: Dhangar, Muslim and Maratha community share the same pain: Manoj Jarange-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.