धनगर समाज,शेतकऱ्यांची आंदोलने
By Admin | Published: September 16, 2014 12:26 AM2014-09-16T00:26:34+5:302014-09-16T01:33:33+5:30
बीड : शासनाकडून प्राप्त झालेली व्याज अनुदानाची रक्कम मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खाती जमा न केल्याने परळी तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांनी बीड शहरातील
बीड : शासनाकडून प्राप्त झालेली व्याज अनुदानाची रक्कम मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खाती जमा न केल्याने परळी तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांनी बीड शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर तर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन सवलत अनुदान योजनेर्तंगत शासनाकडुन व्याज अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असल्याचा आरोप अॅड. अजय बुरांडे यांनी केला आहे. परळी तालुक्यातील भिल्लेगाव, कवळ्याचीवाडी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा मोहा येथे अनुदान मिळण्यासाठी वारंवार निवेदन व पत्र दिले होते. मात्र शाखाधिकारी कसबे यांनी पीक कर्जाच्या व्याज माफी सवलतीची अंमलबजावणी करुन स्वीकारलेली व्याजाची रक्कम परत खात्यावर जमा केली नाही. याबाबत त्यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतर त्यांनी लेखी उत्तर दिले होते. व्याज सवलतीच्या ७ टक्के रकमेची मागणी न करता केवळ ४ टक्के व्याज मागितले आहे. यामुळे उर्वरित ३ टक्के व्याज शाखा व्यवस्थापकाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले असल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. नवीन पीक कर्ज देण्याबाबत शाखाधिकारी यांच्याकडे विनंती केली असता कागदपत्रांची मागणी केली असता नवीन पीक कर्ज संदर्भात योग्य ती कागदपत्रे देऊन कर्जाची मागणी केली. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत.
या उपोषणात सुमंत देशमुख, विष्णू देशमुख, अनिस शेख, अल्लाउद्दीन याकूब शेख, प्रवीण देशमुख, उद्धव निंबाळकर, कोंडीबा कडभाने, चंद्रकांत कडभाने, हनुंमत धावणे, भगवान कडभाने, मदन वाघमारे, बालासाहेब कडभाने, विशाल पुरी, सागर विर्धे, अप्पाराव माने, शेख अली, विशाल देशमुख, बाळासाहेब शेप यांच्यासह आदी शेतकरी बीड येथील सुभाष रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत.
धनगर समाजाला आरक्षण देण्या संदर्भात यशवंत सेनेच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासनाने याचा गांर्भियाने विचार केला नाही. धनगर समाजाला आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ यशवंत सेना धनगर समाजाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. आंदोलन व्यापक स्वरुपात होत असल्याने याची दखल शासनाने घेतली होती. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षण कृती समितीने भेट घेऊन धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळी दोन्ही मंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र याबाबत कोणातही निर्णय घेतला नाही. आता आचार संहिता लागु झाली आहे. त्यामुळे शासन कोणाताही निर्णय जाहीर करु शकणार नसल्याने यशवंत सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण प्रश्नासंदर्भात गेल्या चार-पाच महिन्यापासून धनगर समाज बांधव राज्यात आंदोलने करीत होते. या आंदोलनांची गांर्भियाने दखल घेण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण कृती समितीला आश्वासन देऊन या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वास दिले होते मात्र असे न करता आमचा प्रश्न मार्गी न लावता प्रलंबित ठेवला आहे. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले आहे. धरणे आंदोलनात परमेश्वर सोन्नर, अजय जेटे, संगत बेद्रे, संदिप सोन्नर, विशाल पांढरे, यांच्यासह शेकडो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)