विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ धानोरा ग्रामस्थांनी परत लावला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:27 PM2023-12-23T17:27:03+5:302023-12-23T17:27:32+5:30
मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणतेही कार्यक्रम गावात होऊ देणार नाही
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यातील धानोरा गावात आज सकाळी साडेदहा वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी विरोध केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणतेही राजकीय, शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी यात्रेचा रथ परत पाठवला.
तालुक्यातील भराडी व धानोरा येथे रथ यात्रा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार रमेश जसवंत यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी १० वाजता धानोरा येथे करण्यात येणार होते. मात्र, सकाळी १० वाजता ग्रामस्थांनी यात्रेचा रथ गावातून परत पाठवला. तसेच कार्यक्रमाचा मंडप देखील काढायला लावला.
तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तहसीलदार रमेश जसवंत व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र धानोरा ग्रामस्थांनी माघार घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथून घेतला काढता पाय घेतला.