धर्माबाद शहर झाले हगणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 07:12 PM2017-07-25T19:12:52+5:302017-07-25T19:18:24+5:30
केंद्रीय पथकाने धर्माबाद शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. या कामगिरीमुळे धर्माबाद नगरपालिकेस शासनाकडून प्रोत्साहनपर १ कोटी निधी प्राप्त होणार आहे.
ऑनलाईन लोकमत
नांदेड/ धर्माबाद : स्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय पथकाने बुधवारी (दि. १९) धर्माबाद शहराची पाहणी केली. यात शहर सर्व निकषात पास झाले असून, या पथकाने धर्माबाद शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. या कामगिरीमुळे धर्माबाद नगरपालिकेस शासनाकडून प्रोत्साहनपर १ कोटी निधी प्राप्त होणार आहे.
प्रथम जिल्हा पथक नंतर राज्य पथक व आता केंद्रीय पथकाने शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. धर्माबाद शहराच्या लौकिकात या कामगिरीने अजून भर पडणार आहे. नगरपालीकाने गेली दोन वर्षे स्वच्छतेवर भर देऊन विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधली. नगरपरिषद अध्यक्षा अफझल बेगम अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, सर्व न.प. सदस्य व सर्व कर्मचारी यांनी शहर लोटामुक्त करण्यासाठी विविध मार्गा वापरून प्रयत्न केले.
नगर पालिकेने शहरात गुड मॉर्निंग व गुड इव्हेनिंग पथके तैनात केली, विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सोय केली. शहरातील सामाजिक संघटना, शाळा, कॉलेजेस, व्यापारी, पत्रकार यांच्यासह सर्व नागरिका या महत्वकांक्षी योजनेत सहभाग झाली. याबद्दल मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शासनाच्या पुढील योजनांमध्ये देखील असाच सर्वांचा सहभाग रहावा असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.