धारुर, गेवराई तालुक्यांत आगीचे थैमान; लाखोंची हानी
By Admin | Published: May 3, 2016 11:56 PM2016-05-03T23:56:09+5:302016-05-04T00:06:41+5:30
धारुर/गेवराई : धारूर शहरातील कजबा विभागातील धनगरवाडा भागात व गेवराई तालुक्यातील तळवट बोरगावात मंगळवारी आगीने थैमान घातले.
दुष्काळात होरपळ : कडबा, शेती उपयोगी साहित्य भक्ष्यस्थानी
धारुर/गेवराई : धारूर शहरातील कजबा विभागातील धनगरवाडा भागात व गेवराई तालुक्यातील तळवट बोरगावात मंगळवारी आगीने थैमान घातले. दोन्ही ठिकाणच्या घटनेत लाखोंची हानी झाली आहे.
कजबा विभागातील धनगरवाडा परिसरात जुन्या वाड्यात असणाऱ्या यशवंत लक्ष्मण गायके, वचिष्ठ लक्ष्मण गायके व कृष्णा दगडू शेळके यांच्या कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. दुपारी अचानक आग लागल्याने चारही गंजी जळून खाक झाल्या. शेती उपयोगी अवजारे देखील भक्ष्यस्थानी सापडले. यात ४ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. या आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. नगरपालिकेचे अग्निशामक दल व खाजगी टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. जनावरे वाड्याबाहेर काढल्याने वाचली. महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.
दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील तळवट बोरगांव येथील दोन शेतकऱ्यांच्या ५ गंजीला आग लागून २ गोठे, २ बैलगाडीसह कडबा कुट्टी जळून खाक झाली.
दादाराव घोलप व चंद्रकांत घोलप यांचे गावालगत शेत आहे. त्यांच्या पाच गंजींचा आगीत कोळसा झाला.
आग विझवण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमनदलाचा बंब पाचारण केला होता. मात्र तोपर्यंत काहीच शिल्लक राहिले नव्हते. दोन्ही घटनेतील आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. (वार्ताहर)