ढोल-ताशे २५०० रु., फेटा १००, तर टोपी ३५ रुपये; उमेदवारांना खर्चाची मर्यादा ९५ लाख
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 10, 2024 02:16 PM2024-04-10T14:16:49+5:302024-04-10T14:20:02+5:30
आता प्रचार आणि खर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत कोट्यवधींची उलाढाल होत असते, मात्र या खर्चाला लगाम घालण्यासाठी निवडणूक आयोगाने एक उमेदवार किती खर्च करू शकतो. यावर मर्यादा आणली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात एकूण ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आल्याने, आता प्रचार आणि खर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. कारण, उमेदवारांना खर्चाचा तपशील आयोगाला द्यावा लागणार आहे.
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले दर
खर्चाचा प्रकार दर
राइस प्लेट --- १०० रु.
चहा--- ५ रु.
पोहे---१० रु.
उपमा---१० रु.
शिरा--- १० रु.
पाण्याची बाटली---१५ रु.
पाण्याचा जार--- २० रु.
जरीचा फेटा---१०० रु.
टोपी--- ३५ रु.
भोंगा--- ६०० रु.
ढोल-ताशे--- २५०० रु. (चार व्यक्ती प्रतिदिन)
असे ५१८ प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
कोणत्या बँकेत उघडावे लागेल खाते?
कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा सहकारी बँकेत उमेदवार खाते उघडू शकतो. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच खाते बँकेत उघडावे लागेल. कारण, उमेदवारी अर्ज भरताना खाते क्रमांकाचा उल्लेख करावा लागणार आहे.
दैनंदिन खर्चाची नोंद करणे अनिवार्य
उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना खर्चाच्या नोंदणीसाठी रिटर्निंग ऑफिसर रजिस्टर दिले जाणार आहे. त्या रजिस्टरमध्ये उमेदवाराला निवडणूक काळात झालेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. या नोंदी ठेवणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे.
दरपत्रकाचे पालन करावे लागणार
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी किती खर्च करायचा, याची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच प्रचारात लागणाऱ्या कोणत्या उत्पादनावर किती खर्च करायचा, याचे दर निश्चिती समितीने ठरवले आहेत. उमेदवारांना या दरपत्रकाचे पालन करावे लागणार आहे.
- देवेंद्र कटके, निवडणूक उपजिल्हाधिकारी