यंदाही दिवाळीत ‘बोनस’ची धूम; नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:42 PM2020-10-23T18:42:07+5:302020-10-23T18:45:34+5:30
यावर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग अडीच-तीन महिने बंद जरी असले, तरी त्यांना बोनस द्यावाच लागणार आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे देशभरातील उद्योगधंदे, बाजारपेठा तीन-चार महिने ठप्प होत्या. त्यामुळे यंदा कामगारांना बोनस मिळेल का, असा संभ्रम निर्माण झाला होता; पण घाबरून जाण्याचे कारण नाही. कायद्यानुसार बोनस द्यावाच लागतो. यंदाही तो वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात उद्याेगांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून, साधारणपणे १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत बोनसचा पैसा कामगारांच्या हातात येईल.
यंदा ‘बोनस’ची स्थिती काय राहील, यासंदर्भात ‘लोकमत’ने उद्योग संघटना व मोठ्या उद्योगांची भूमिका जाणून घेतली. तेव्हा बोनसबाबतच्या कायद्यानुसार मागील आर्थिक वर्षातील उलाढालीवर पुढील वर्षातील दिवाळीपूर्वी कामगारांना बोनसचा लाभ दिला जातो. त्यामुळे यावर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग अडीच-तीन महिने बंद जरी असले, तरी त्यांना बोनस द्यावाच लागणार आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत बोनसच्या रकमेचे प्रमाण कमी-अधिक राहू शकते.
बजाज ऑटो कंपनीतील भारतीय कामगार सेनेचे नेते विलास जाधव म्हणाले की, बोनससंदर्भात व्यवस्थापनासोबत आमचे बोलणे चालू आहे.
दिवाळीनिमित्त बोनस व पगार हा १ नोव्हेंबर रोजी करावा, अशी आमची मागणी आहे. गेल्या वर्षी बजाजच्या कामगारांना सरासरी २५ हजार रुपये बोनस मिळाला होता. याबाबत उद्या २३ नोव्हेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल, असे जाधव यांनी सांगितले.‘व्हेरॉक’चे मनुष्यबळ विकास (एचआर हेड) विभागाचे व्यवस्थापक सतीश मांडे यांनी सांगितले की, कायद्यानुसार बोनस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही तो देणार आहोत. तो कधी द्यायचा, किती द्यायचा, यासंबंधी आताच जाहीरपणे सांगणे उचित होणार नाही. आमच्या कंपनीमध्ये कामगारांना सरसकट बोनसची रक्कम वितरित केली जाते. यासाठी आम्हाला संघटनेसोबत चर्चा करण्याची गरज नाही.
बोनसवर कोरोनाचा परिणाम नाही
‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने उद्योग बंद होते. सध्या नाजूक परिस्थितीतून उद्योग वाटचाल करीत आहेत. याचा परिणाम बोनसवर होईल, असा अंदाज लावणे चुकीचे राहील. उद्योगांंना नियमानुसार बोनस द्यावाच लागणार आहे. दोन प्रकारचे बोनस असतात. एक कायद्यानुसार दिला जाणारा व दुसरा उद्योगाला नफा अधिक झाल्यामुळे स्वेच्छेने दिला जाणारा. यावेळी स्वेच्छेने दिला जाणाऱ्या बोनसवर मात्र मर्यादा येतील.
बोनस द्यावाच लागेल
यासंदर्भात ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले, काहीही जरी झाले तरी उद्योगांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावाच लागेल. काही कंपन्या ऑक्टोबर अखेरपर्यंत, तर काही १० नोव्हेंबरपर्यंत बोनसचे वितरण करतील. नियमानुसार मागच्या आर्थिक वर्षातील उलाढालीवर बोनसची रक्कम निश्चित केली जाते.