रेल्वेरुळावर धूम स्टाईल मस्ती आली अंगलट; दुचाकी सोडून पळ काढल्याने तरुणाचा वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:39 PM2019-05-06T16:39:04+5:302019-05-06T22:51:56+5:30
भरधाव रेल्वेच्या धडकेने मोपेड सुमारे ५० ते ६० मिटर फरफटत गेली.
औरंगाबाद : मोपेडवरून धूम स्टाईल रेल्वेरूळ ओलांडणे तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी सकाळी संग्रामनगर रेल्वेरूळावर घडली. रेल्वे येत असल्याचे दिसताच प्रसंगावधान राखून रेल्वेरूळावर मोपेड सोडून चालकाने धूम ठोकल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेत मोपेडचा चुरडा होऊन तुकडे-तुकडे झाले. याघटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली.
अधिक माहिती देताना प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, संग्रामनगर रेल्वेरूळ परिसरातील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वेरूळ ओलांडत असतात. काही महाशय तर चक्क रेल्वेरूळावरून त्यांच्या दुचाकी नेतात. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी एक तरूण बायपासकडून संग्रामनगरकडे मोपेडने येऊ लागला.यावेळी तो मोपेडवरून रेल्वेरूळ ओलांडू लागला. रूळामध्ये त्याची दुचाकी अडकली आणि त्याचवेळी मराठवाडा एक्स्प्रेस हॉर्न वाजवित पुढील प्रवासाला येत होती.
यावेळी प्रयत्न करूनही त्याला मोपेड रूळावरून बाजूला घेता येईना. रेल्वे जवळ आल्याचे पाहून त्याने प्रसंगावधान राखत मोपेड रूळावर सोडून तेथून पळ काढला. यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र भरधाव रेल्वेच्या धडकेने त्याची मोपेड सुमारे ५० ते ६० मिटर फरफटत नेली. या घटनेत त्याच्या मोपेडचे स्पेअर पार्ट वेगवेगळे होऊन रूळावर विखुरले. यावेळी रेल्वेचालकाने गाडी इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबविली.
या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना कळविली.यानंतर जमादार आवारे, कुंदन शेळके आणि लोहमार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि रूळावरील मोपेडचे विखुरलेले स्पेअरपार्ट जप्त केले. पोलीस मोपेडस्वार तरूणाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रेल्वेरुळाच्या अनेक चाव्या निखळून पडल्या होत्या. त्यातून रेल्वे घसरण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने पुढील अनर्थ टळला.