‘धुंद’ मुख्याध्यापकाचा शाळेत धिंगाणा
By Admin | Published: June 19, 2017 11:40 PM2017-06-19T23:40:19+5:302017-06-19T23:45:52+5:30
माजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यु.आर. धन्वे याने थोडी लावून शाळेतच ‘धिंगाना घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यु.आर. धन्वे याने थोडी लावून शाळेतच ‘धिंगाना घातला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी शाळेत येऊन त्याला चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच पोलीस व गटविकास अधिकाऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.
सिमरी पारगाव येथे आठवीपर्यंत जि.प.ची शाळा आहे. या ठिकाणी आठ शिक्षक कार्यरत आहेत. यु.आर. धन्वे हा या शाळेत वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. अनेकवेळा तो शाळेत थोडी ‘लावून’च आल्याचे विद्यार्थी सांगतात. याबाबत केंद्रप्रमुखांच्या कानावर घातला. परंतु काहीच उपयोग झाला नाही.
१५ जूनपासून शाळा सुरू होताच मुख्याध्यापक धन्वे यांनी पुन्हा आपले कारनामे दाखवायला सुरूवात केली. सोमवारीही ते सकाळी थोडी ‘लावून’च शाळेत आले होते. यावेळी त्यांनी साहित्याची तोडफोड करण्यासह धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली आणि परिस्थितीची खात्री करून धन्वे यांना चांगलाच चोप दिला. तसेच त्याला वर्गखोलीत कोंडून ठेवले. घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि माजलगावचे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण व पं.स.उपसभापती सुशील सोळंके यांनी धाव घेतली. याचा पंचनामाही झाला आहे.