डायलिसिस म्हणजे पैसा खाणारा उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:05 AM2017-09-11T01:05:35+5:302017-09-11T01:05:35+5:30
एमजीएम’मध्ये आयोजित केलेल्या दोनदिवसीय इंडियन अकॅडमी आॅफ नेफ्रॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी (दि. १०) समारोप झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोणत्याही आजारासाठी खर्चाची वेळ येऊ नये, यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. मूत्रपिंडविकार लवकर लक्षात आला तर वेळीच उपचार घेतले पाहिजे. मूत्रपिंड विकारात डायलिसिस करण्याची वेळ येते. परंतु डायलिसिस हा पैसा खाणारा उपचार आहे. अनेक सधन व्यक्ती डायलिसिसच्या उपचारापोटी खर्च करून आर्थिक विवंचनेला सामोरे गेल्याची खंत बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिसीन येथील डिपार्टमेंट आॅफ नेफ्रॉलॉजीचे विभागप्रमुख डॉ. अशोक किरपालानी यांनी व्यक्त केली.
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी विभाग, औरंगाबाद नेफ्रॉलॉजी सोसायटी यांच्या विद्यमाने ‘एमजीएम’मध्ये आयोजित केलेल्या दोनदिवसीय इंडियन अकॅडमी आॅफ नेफ्रॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी (दि. १०) समारोप झाला. यावेळी डॉ. किरपालानी बोलत होते. समारोपप्रसंगी डॉ. किरपालानी, नॅशनल आर्गन अॅण्ड टिशु ट्रान्सप्लांटेशन आॅर्गनायझेशनचे (एनओटीटीओ) मुख्य सल्लागार डॉ. संजय अग्रवाल, दिल्ली येथील डॉ. दीपंकर भौमिक यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. किरपालानी म्हणाले, मूत्रपिंड, हृदयरोगावरील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. यावरील उपचाराचे संशोधन हे परदेशातून आले आहे. त्यामुळे त्यावरील उपचार महाग आहे. वेळीच खबरदारी घेतली तर मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयाच्या शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात. ९५ टक्के रक्तदाबाच्या समस्येचे कारणच कळत नाही. रक्तदाब आणि मूत्रपिंडविकाराचा जवळचा संबंध आहे.
मूत्रपिंडाबरोबर ब्रेन स्ट्रोक, हृदयाचा झटकाही येऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे. स्पर्धा, वाढलेले वजन, जंक फूड, मानसिक ताण आणि बदलती जीवनशैली रक्तदाब वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, असे डॉ. किरपालानी म्हणाले.
डॉ. दीपंकर भौमिक यांनी डायलिसिस उपचारावर मार्गदर्शन केले.
यावेळी परिषदेचे निमंत्रक डॉ. सुधीर कुलकर्णी, आयोजन अध्यक्ष डॉ. प्रशांत पारगावकर, सचिव डॉ. रवींद्र भट्टू, डॉ. सचिन सोनी, डॉ. शेखर शिराढोणकर, डॉ. क्षितिजा गाडेकर आदी उपस्थित होते.