घाटीत ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये दीड हजार रुग्णांचे डायलिसिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:57+5:302021-05-27T04:04:57+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. त्याबरोबरच याठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी डायलिसिसची ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. त्याबरोबरच याठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधाही सुरू आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १ हजार ४५७ रुग्णांचे डायलिसिस झाले.
सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत गतवर्षी १३ जूनपासून कोरोना रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच याठिकाणी ६ डायलिसिस मशीनही नॉन कोविड रुग्णांसाठी कार्यान्वित झाल्या आहेत. महिन्याला ३०० ते ४०० रुग्णांचे डायलिसिस होत आहे. घाटीत मराठवाड्याबरोबरच विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. घाटीमध्ये येणाऱ्या बहुतेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असते. किडनीच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांबरोबरच त्याच्या कुटुंबालाही आर्थिक लढाया लढत उपचार घ्यावे लागतात. त्यात डायलिसिससारखे उपचार दीर्घ काळापर्यंत घ्यावे लागतात. त्यासाठी लागणारा खर्च जास्त असतो. त्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसते, अशा रुग्णांना घाटीचा आधार मिळत आहे.
जानेवारीत रेकॉर्डब्रेक डायलिसिस
जानेवारी महिन्यात सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये रेकॉर्डब्रेक तब्बल ४४७ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. फेब्रुवारीत ३५८, मार्चमध्ये ३०४, एप्रिलमध्ये १९९ आणि मे महिन्यात आतापर्यंत १४९ रुग्णांचे डायलिसिस झाले, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्यअधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.
---
फोटो ओळ..
सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये असलेले डायलिसिस युनिट.