ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 07:22 PM2018-04-11T19:22:29+5:302018-04-11T19:27:51+5:30

शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Diarrhea, malaria and the risk of collar in the city due to the depletion of waste in the area | ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी पावसाने एकीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला; परंतु दुसरीकडे शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात जागोजागी आणि रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्याने कचरा भिजला, ही शहराच्या आरोग्यासाठी सर्वांत गंभीर बाब आहे. ओल्या कचऱ्यात आजारांना आमंत्रण देणारे विषाणू वाढून विविध आजार डोकेवर काढू शकतात. शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत कचरा वाहून रस्त्यावर आला आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेकदा विविध ठिकाणी जलवाहिनींना गळती असते. त्यामुळे यातून दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रकार होऊन जलजन्य विकारांमध्ये वाढ होण्यास हातभार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील विविध भागांत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि त्यात पडलेला पाऊस यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. कचऱ्यामुळे आधीच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या पावसाने कचरा सडून त्यातून आणखी दुर्गंधी पसरण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले जात आहे.

मनपाकडून औषध फवारणीही बंद
शहरात मागील ५४ दिवसांपासून कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडी फोडण्यात अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. जुन्या शहरातील विविध चौकांमध्ये कचरा पडून आहे. या कचऱ्यावर मनपाकडून औषध फवारणी करण्यात येत होती. आता मनपाने औषध फवारणीही बंद केली. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दुर्गंधीत अधिक वाढ झाली आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. सुरुवातीला कचऱ्यावर माशा बसू नयेत म्हणून बायोट्रिट पावडरची फवारणी करण्यात येत होती. एक आठवडाच औैषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर मनपाने फवारणी बंद केली. मनपाच्या झोन १, २ आणि ३ मध्ये सर्वाधिक कचऱ्याचे डोंगर आहेत. या तिन्ही झोनमध्ये कचऱ्याचे अजिबात वर्गीकरण होत नाही. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी मनपाकडून फारसे प्रयत्नही होताना दिसून येत नाहीत. ज्या वसाहतींमध्ये कचरा साचलेला आहे, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्यात लागत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर दुर्गंधीत अधिक भर पडली आहे.

आणखी पाऊस पडला तर...
शहरातील कचऱ्याची परिस्थिती पाहता एक पाऊसही चिंतादायक ठरू शकतो, अशा परिस्थितीत आणखी एक, दोन दिवस जरी पाऊस पडला तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साथरोग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. 

आजारांना आमंत्रण
पावसामुळे कचरा ओला झाला आहे. अशा ओल्या कचऱ्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे जंतू वाढू शकतात. डायरिया, कॉलरा, कावीळ, मलेरिया यासह विषाणू आणि जलजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
-डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशिय असोसिएशन, औरंगाबाद

Web Title: Diarrhea, malaria and the risk of collar in the city due to the depletion of waste in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.