४०० वर्षांपूर्वीचे चिंच अन शमीच्या झाडालगतचे कार्येश्वर महादेव मंदिर पाहिले का ?
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 31, 2023 01:15 PM2023-07-31T13:15:08+5:302023-07-31T13:26:50+5:30
अधिक मास विशेष : साताऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान
छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यात निसर्गरम्य वातावरणात शमी व चिंच वृक्षाच्या मधोमध स्थापित कार्येश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक रोज येत आहेत. अधिक मासानिमित्त सोमवारी येथे विशेष गर्दी पाहण्यास मिळते.
साताऱ्याकडून भारत बटालियनकडे जाताना डाव्या बाजूस एक रस्ता देवळाईकडे जातो. याच रस्त्यावर हे मंदिर आहे. समोरील बाजूस भले मोठे चिंचेचे झाड हीच या मंदिराची खूण आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे हे झाड असल्याने येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मंदिरात जाताना पूर्व बाजूला प्रथम कार्येश्वर गणपती बाप्पाचे दर्शन होते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. अनेकांना वाकूनच आत जावे लागते. गाभाऱ्यात ६ बाय ४ फुटांच्या भव्य शिवलिंगाचे दर्शन होते. याच मंदिराच्या बाजूला सप्तर्षींची समाधी आहे. या समाधीमुळे पूर्वी येथील नागरिक या मंदिराला समाधीचे महादेव मंदिर असेही म्हणत. मात्र, अलीकडच्या काळात ‘कार्येश्वर महादेव मंदिर’ असे नामकरण करण्यात आले. याच मंदिरासमोर दाट दुर्वा उगवल्या आहेत. दक्षिण बाजूस अनेक झाडे असून, त्यात एक शमीचे झाड आहे. तसेच पूर्व बाजूला एक ओढा आहे. याच ओढ्याच्या काठावर हे प्राचीन मंदिर आहे. शहराजवळच, पण वर्दळीपासून दूर निसर्गरम्य, शांत वातावरणातील कार्येश्वर महादेव मंदिर सातारा व देवळाई परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
भगवान श्रीरामाने मुक्काम केल्याची आख्यायिका
हे शिवलिंग किती प्राचीन आहे याचे दाखले देण्यासाठी येथील नागरिक आख्यायिका सांगतात. सीतेच्या शोधात जेव्हा श्रीराम निघाले, तेव्हा त्यांनी येथे मुक्काम केला होता. सप्तर्षी (सात ऋषी) काही काळ या परिसरात राहत होते. त्यांनीच येथे महादेवाची पिंड स्थापन केली, अशीही आख्यायिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकांनी त्या काळी काही दिवस या मंदिराच्या परिसरात मुक्काम केला होता.