कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतले का? जाणून घ्या पोटोबाच्या काळजीसाठी घरगुती उपाय
By संतोष हिरेमठ | Published: September 14, 2023 06:44 PM2023-09-14T18:44:13+5:302023-09-14T18:44:52+5:30
पोटाच्या अनेक त्रासांत सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा सल्ला दिला जातो
छत्रपती संभाजीनगर : हल्ली अनेक कारणांनी पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. कधी जेवलेले पचत नाही, तर गॅसचा त्रास, तर कधी पोटातून आवाज येण्याचा त्रास होतो. सकाळी कोमट पाण्यात लिंबू घेतल्यास पोटाच्या विविध आजारांवर ते गुणकारी ठरते. अगदी घरच्या घरी पोटदुखी कमी करता येते. मात्र, अधिक त्रास होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.
पोटाच्या अनेक त्रासांत सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पचनाशी संबंधित समस्या दूर करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. दररोज सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू रक्तदाब, नैराश्य आणि यकृतासाठी खूप चांगले आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
ऋतू बदलताना पोटाची काळजी घ्या
ऋतू बदलताना पोटाची काळजी घेतली पाहिजे. कारण हिवाळ्यात पचनशक्ती चांगली राहते. मात्र, पावसाळ्यात, उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावत असते.
पोटाच्या आजारावर घरगुती उपाय
पाणी प्यावे : एक ग्लास पाणी हा पोटदुखी थांबविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. विशेषतः जर वेळेवर काही खाणे शक्य नसेल, तर पाणी प्यावे. पोट भरण्यासोबतच पाणी पचनालाही मदत करते. या दोन्ही क्रिया पोट फुगणे कमी करण्यास मदत करतात.
सब्जा, बीट, दही : दही, सब्जा सीड्स, बीट, आले, लसून यांचा आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे पचन सुधारते आणि पोट निरोगी राहते.
हर्बल चहा : पुदिना, आले, सिंहपर्णीची मुळं आणि बडीशेप यापासून बनविलेला हर्बल चहा पचनास मदत करू शकतो व आतड्याच्या स्नायूंना आराम देऊ शकतो.
तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर अर्धा चमचा आवळा चूर्ण, शेंदेलोण घ्यावे. पोटात गॅसचा त्रास होत असेल, तर धने, जिरे टाकून पाणी प्यावे. अधिक त्रास होत असेल, तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- वैद्य सोहन पाठक, आयुर्वेद तज्ज्ञ.