तुम्ही चारधामसाठी केदारनाथला चालला? जरा थांबा हो, केदारनाथ मंदिरच उभारतेय चिकलठाण्यात
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 22, 2023 06:07 PM2023-09-22T18:07:53+5:302023-09-22T18:08:06+5:30
सजीव व निर्जीव देखाव्यांची चार दशकांची परंपरा असलेल्या या मंडळाने मागील वर्षी अमृतसरमधील सुवर्णमंदिराची प्रतिकृती उभारली होती.
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही चारधामपैकी एक असलेल्या उत्तराखंड येथील ‘केदारनाथ’ला चालला आहात... एवढा लांबचा प्रवास करण्याची सध्या गरज नाही. होय, तुम्हाला केदारनाथचे दर्शन शहरातच होणार आहे. आता तुम्ही म्हणाल काय थट्टा करता राव... पण ही थट्टा नव्हे तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने चिकलठाण्यात ‘केदारनाथ’ मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे. येथेच तुम्हाला भगवंतांचे दर्शन होणार आहे.
चिकलठाण्यातील गणेशोत्सव सजीव देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, मागील काही वर्षांत येथील सावता गणेश मंडळाने भव्य-दिव्य आकारातील निर्जीव देखावे उभारण्याची परंपरा सुरू केली आहे. यंदा या गणेश मंडळाचे ३९ वे वर्ष सुरू आहे. सजीव व निर्जीव देखाव्यांची चार दशकांची परंपरा असलेल्या या मंडळाने मागील वर्षी अमृतसरमधील सुवर्णमंदिराची प्रतिकृती उभारली होती.
यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे. पं. प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराणामुळे भाविक मोठ्या संख्येने भगवान महादेवाची भक्ती करत आहेत. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्यातही महिलांमध्ये ‘एक लोटा जल’ अभिषेक मोठ्या संख्येने करत आहेत. हेच भगवान महादेवावरील वाढती भक्ती, श्रद्धा लक्षात घेऊन केदारनाथची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मग, गणेशोत्सवात केदारनाथच्या दर्शनासाठी चिकलठाण्यात आर्वजून या, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
१४० फूट उंचीचे मंदिर
केदारनाथ मंदिराची प्रतिकृती १७० फूट बाय १८० फूट जागेवर उभारली जात आहे. जमीन ते कळसापर्यंतची उंची १४० फूट आहे. मंदिराच्या चारी बाजूने डोंगर उभारण्यात येत असून त्यावर जणू काही बर्फ असल्यासारखा भास होईल. मंदिरावर पुढे व मागील बाजूस भव्य दोन कलश असणार आहे.