Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 03:42 PM2023-09-16T15:42:29+5:302023-09-16T15:51:12+5:30
भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक केली विचारणा...
छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेला जाणार असे म्हटल्याने जोरदार घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, खा. राऊत यांनी पास देखील घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिल्याने याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आज पत्रपरिषदेत खा. संजय राऊत हे अनुपस्थित होते. यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी भर पत्रकार परिषदेत अचानकपणे, राऊत आले नाही का? अशी विचारणा करत टोला लगावला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रपरिषद घेतली. यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा केली. विविध निर्णय घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक, ''राऊत आले नाहीत का ? अशी विचारणा केली. त्यानंतर विकास राऊत, तुमचे लोकमतचे आहेत न विकास राऊत'' असे पुढे म्हणत खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मात्र, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेची चर्चा सुरु झाली.
संजय राऊत काय म्हणाले होते
मला विचारण्यात आले, तुम्ही जाणार का? तर मी म्हंटले, माझी इच्छा आहे, पत्रकारांनी प्रश्न विचारावेत. मला संधी मिळाली तर मी विचारेल. मात्र, मी जाणार म्हंटल्या पासून पोलिसांनी माझ्याशी संपर्क केला. सर्व पोलीस बंदोबस्त पत्रकार परिषदेकडे लावला. मी वार्ताहर आहे, संपादक आहे. राज्यातील सर्वात जेष्ठ संपादक आहे, माझी इच्छा झाली तर मी जाईल, पण मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नकोय, असा खुलासाही खासदार राउत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.