सिडकोच्या बसेससाठी अखेर डिझेल पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:30 PM2017-08-14T22:30:11+5:302017-08-14T22:30:32+5:30
सिडको बसस्थानकातील बसगाड्यांसाठी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत उभारण्यात आलेल्या स्वतंत्र डिझेल पंपाचे सोमवारी (दि. १४) उद्घाटन करण्यात आले.
औरंगाबाद, दि. 14 - सिडको बसस्थानकातील बसगाड्यांसाठी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत उभारण्यात आलेल्या स्वतंत्र डिझेल पंपाचे सोमवारी (दि. १४) उद्घाटन करण्यात आले. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षनेनंतर अखेर हा पंप कार्यान्वित झाल्याने यापुढे इंधनासाठी सिडको बसस्थानकाच्या बसगाड्यांना बसणारा ७.४. कि.मी. चा फेरा वाचणार आहे.
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्वतंत्र डिझेल पंप उभारण्यात आला ; परंतु गेली अनेक महिने परवानगीअभावी पंप सुरू होण्यास विलंब झाला. परिणामी इंधनासाठी सिडको बसस्थानकातील बसगाड्या ७.४ कि. मी. अंतरावर असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात पाठविण्याची वेळ येत होती. त्यामुळे दररोज शेकडो लिटर इंधन ये-जा करण्यातच व्यर्थ जात असून, महामंडळाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. हा प्रकार‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. त्यानंतर हा पंप लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले. अखेर हा पंप आता सुरू झाला आहे.
उममहाव्यवस्थापक मधुकर पठारे, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक यू. ए. काटे यांच्या हस्ते सोमवारी डिझेल पंपाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण आदी उपस्थित होते.
१०० बसेसची सुविधा...
डिझेल पंपअभावी सिडको बसस्थानकाच्या शहर बस, ग्रामीण भागातील बसगाड्या इंधनासाठी मध्यवर्ती बसस्थानकात जावे लागत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बसगाड्यांची नाहक भर पडत होती. शिवाय सिडको बसस्थानकातील जालना, तसेच इतर शहरांच्या बसगाड्यांना प्रवासाच्या मार्गावरील पंपांवर इंधन भरावे लागते. अनेकदा इंधन भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वादाचे प्रकार होतात. परंतु आता या डिझेल पंपामुळे १०० बसेसच्या इंधनाची सुविधा होणार आहे.