जमिनीच्या मोबदल्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:32 AM2017-10-23T01:32:38+5:302017-10-23T01:32:38+5:30
जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या एकाच गटातील जमिनीला वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या मोबदल्यातील तफावतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, जमीन देण्यास विरोध होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या एकाच गटातील जमिनीला वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या मोबदल्यातील तफावतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, जमीन देण्यास विरोध होत आहे. एका गटातील जमिनीला सारखाचा दर मिळावा, अशी समृद्धीबाधित शेतक-यांची मागणी आहे.
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ५१२ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीची जिरायती, हंगामी बागायती व बागायती, असे तीन गट करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश गावांमध्ये एकाच शेतक-याची एकाच गटातील काही जमीन बागायत तर काही जमीन जिरायती दाखविण्यात आली आहेत.
संपूर्ण संचिन सुविधा उपलब्ध असताना केवळ ऊस, फळबागा असणारी जमिनी बागायती तर अन्य पिके असणारी जमीन जिरायती दाखविण्यात आली आहे. त्यानुसार जमिनीला वेगवेगळा दर निश्चित करण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला आहे.
परिणामी बागायती जमीन मोठ्या प्रमाणात असलेल्या गावांमधील शेतकरी जमीन देण्यास विरोध करत आहेत. बारमही सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या एका गटातील जमिनीला वेगवेगळे दर न बागायती जमिनीचे दर द्यावे, अशी मागणी समृद्धीबाधित शेतक-यांमधून केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून जमिनीचा दर ठरविण्याचे वेगवेगळे निकष पुढे करून शेतकºयांची दिशाभूल करत असल्याचे शेतकरी हक्क बचाव व कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत गाढे यांनी सांगितले.