लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण; पण सर्वोत्तम : डेव्हिड हायमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 07:57 PM2019-03-20T19:57:56+5:302019-03-20T20:06:09+5:30
अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेव्हिड हायमर यांचे प्रतिपादन
औरंगाबाद : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासारख्या विविधता असलेल्या देशात लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण काम आहे; पण हीच लोकशाही जनतेच्या विकासासाठी, स्वातंत्र्य, हक्कासाठी सर्वोत्तम असल्याचे मत अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील मोल्युक्युलर बायॉलॉजीचे शास्त्रज्ञ प्रोफेसर डेव्हिड हायमर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हार्बट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग संशोधन केंद्रात संशोधकांना ‘बायोडायर्व्हसिटी स्टडीज’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डेव्हिड हायमर हे दहा दिवसांपासून विद्यापीठात वास्तव्याला आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लोकशाहीसारखी किचकट, पण सर्वोत्तम प्रक्रिया राबविणे कठीण असते. पाच वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या मतानुसार सत्ताधारी निवडावा लागतो. यात वेळ, पैसा वाया जातो. मात्र, नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित राहते. जर सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा बदलण्याची संधी या लोकशाहीतील मतदानाद्वारे नागरिकांना मिळते. व्हिएतनाम देशात जेव्हा वास्तव्याला होतो, तेव्हा त्याठिकाणी लोकशाही नव्हती. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. साध्या जीवनावश्यक वस्तू बाळगणेही सरकारच्या मर्जीवर अवलंबून होते. त्यामुळे लोकशाही ही महत्त्वाची असते.
सोशल मीडियाचा वापर नाही
सोशल मीडियाचा वापर किती केला जातो? या प्रश्नावर त्यांनी सांगितले, फेसबुक माहीत आहे; मात्र त्याचा वापर करीत नाही. भारतात येताना मुलीने व्हॉट्सअॅपसारखे अॅप संवाद साधण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तोपर्यंत व्हॉटस्अॅपविषयी माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेलशिवाय इतर कोणत्याही बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जात नसल्याचेही डेव्हिड हायमर यांनी सांगितले.
हवाई बेट आणि मराठवाड्याच्या समस्या सारख्याच
अमेरिकेतील हवाई बेट आणि मराठवाड्यातील पर्यावरण, पाणी, शेतीच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. या समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शेती, पर्यावरणाच्या समस्या सोडविता येऊ शकतात. अमेरिकेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, संशोधनाची गोडी लागावी यासाठी माध्यमिक शिक्षण घेतानाच अधिक प्रयत्न केले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादेत वाहन चालविणे कठीण
औरंगाबाद शहरात वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नसल्याचे दिसून आले. यामुळे वाहन चालविण्याचा प्रयत्नच केला नाही. विद्यापीठातील डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनाच वाहन चालविण्यास सांगतो, असेही त्यांनी सांगितले.