बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैल खरेदी-विक्रीत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:09+5:302021-05-13T04:06:09+5:30
आठवडी बाजार बंद असल्याने, ज्यांना बैलविक्री करायचे आहेत, त्यांना ग्राहक नाहीत. ज्यांना विकत घ्यायचे आहेत, त्यांनाही विक्री करणाऱ्यांपर्यंत पोहोचता ...
आठवडी बाजार बंद असल्याने, ज्यांना बैलविक्री करायचे आहेत, त्यांना ग्राहक नाहीत. ज्यांना विकत घ्यायचे आहेत, त्यांनाही विक्री करणाऱ्यांपर्यंत पोहोचता येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच खरीपपूर्व हंगामाची कामे आता सुरू झाली आहेत. त्यामुळे बैलाविना शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शेतीच्या अंतरमशागतीसाठी ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, त्यास वखरणीसाठी चारा, तसेच नगदी स्वरूपात पैसे दिले जात आहेत
किंवा अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे वळले आहे. मात्र, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीचे दर प्रचंड वाढल्यामुळे तेथेही शेतकऱ्यांची गोची होत आहे.
चौकट
व्हॉट्सॲपद्वारे बैलजोडीचा व्यवहार
सध्या बैलबाजार बंद असल्याने अनेक शेतकरी व्हॉट्सॲपद्वारे बैलजोडीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत आहे. यात बैलांचा फोटो, वय, रंग, किंमत अशी माहितीही दिली जात आहे. सध्या शेतकऱ्यांची अडचण पाहता, बैलजोड्यांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा सांगितल्या जात आहेत.
कोट
शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीची आवश्यकता आहे. मात्र, कोरोनामुळे बैलबाजार बंद आहे. त्यामुळे बैलजोडीची खरेदी कशी करावी, हा प्रश्न आहे, तसेच किमतीही अवाच्या सव्वा सांगितल्या जात आहेत.
- संदीप फरकाडे, शेतकरी, बनकिन्होळा.