अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 03:53 PM2022-02-05T15:53:28+5:302022-02-05T15:54:15+5:30
अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री आमनेसामने आले.
औरंगाबाद : दुध संघाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या जिल्यातील दोन मंत्री आमनेसामने आले होते. यात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना धोबीपछाड दिला आहे. भुमरे गटाचे दिलीप निरफळ ९ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले आहे. तर सत्तार गटाच्या गोकुळसिंग राजपूत यांचा पराभव झाला आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला १४ सदस्यांसाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न झाले, मात्र यात अर्धे यश आले. यामुळे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस पक्षातील नेते एकत्र आले. सर्वपक्षीय विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक झाली. यात भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता होती.
आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्षपदासाठी अनेपक्षितरित्या शिवसेनेचे जिल्यातील दोन मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार आमनेसामने आले. भुमरे गटाकडून दिलीप निरफळ तर सत्तार गटाकडून गोकुळ सिंग राजपूत यांच्यात यांच्यात निवडणूक झाली. यात दिलीप निरफळ यांनी ९ विरुद्ध ५ मतांनी राजपूत यांच्यावर विजय मिळवला.
शिवसेनेचा उमेदवार विजयी
यापूर्वी देखील शिवसेनेचा उपाध्यक्ष होता आताही निवडून आला आहे. हा मतदारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तिन मराठा नेत्यांनी एकत्र येते ओबीसी उमेदवाराचा पराभव केल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली.
दुध संघातील सदस्य असे
नंदू काळे (पैठण), सविता अधाने (खुलताबाद), श्रीरंग साळवे (सिल्लोड), दिलीप निरफळ (गंगापूर), इंदूबाई सुरडकर (एससी राखीव), श्रीमती चोपडे (सोयगाव), राजेंद्र जैस्वाल (ओबीसी) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद तालुका : हरिभाऊ बागडे, कन्नड तालुका : गोकुळसिंग राजपूत, फुलंब्री तालुका : संदीप बोरसे, वैजापूर तालका : कचरू डिके, महिला राखीव मतदारसंघातून शीलाबाई काकासाहेब कोळगे, अलका रमेश पाटील डोणगावकर, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी- पुंडिलकराव काजे हे निवडणुकीतून विजयी झाले आहेत.