शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 PM2021-02-11T16:13:45+5:302021-02-11T16:29:35+5:30

गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

Dindi marches to Paithan from all over the state without waiting for the government decision | शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

googlenewsNext
ठळक मुद्देयात्रेबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष वारकऱ्यांचे यात्रा रद्द न करण्याचे आवाहन

- संजय जाधव
पैठण : नाथषष्ठी यात्रेसंदर्भात प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता राजभरातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पैठणकडे कूच केली आहे. कोरोनाचे वातावरण निवळले असल्याने प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

पैठण येथे नाथषष्ठीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी दिंड्या घेऊन येतात. २ एप्रिल रोजी नाथषष्ठी महोत्सव साजरा होणार आहे. यामुळे राज्यभरातून वारकरी संप्रदायाने पायी दिंड्या घेऊन पैठणकडे प्रस्थान केले आहे. तर काही प्रस्थानाच्या तयारीत आहेत. गतवर्षी शेकडो दिंड्या पैठणच्या सीमेवर येऊन धडकलेल्या असताना कोरोनामुळे सर्वांना परतावे लागले होते. यामुळे प्रथमच ४५० वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली होती. यंदा मात्र शासन काय निर्णय घेणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोविडचा प्रभाव आता कमी झालेला असून हळूहळू वातावरण पूर्वपदावर येत असल्याने यंदाच्या नाथषष्ठीला प्रशासनाने मान्यता द्यावी, अशी वारकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. महिनाभरापासून पैठण नाथषष्ठी यात्रेला जाण्याचे नियोजन सुरू होते. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागांतून नाथषष्ठीसाठी वारकरी पायी दिंड्या घेऊन निघतात. दिंडीचे प्रस्थानस्थळ व पैठणचे अंतर लक्षात घेऊन दिंडी गावातून काढली जाते. काही दिंड्या महिनाभर तर काही दीड महिनाअगोदरच गावातून प्रस्थान करतात. यामुळे प्रशासनाने यात्रेबाबत धोरण निश्चित केल्यास वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

वारकरी निघाले ; यात्रा रद्द करू नका
वारकऱ्यांना गतवर्षी अचानक परत फिरावे लागल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पंढरपूर व पैठण वारीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असून गतवर्षात वारीची परंपरा खंडित झाल्याने वारकरी दु:खी आहे. यंदा कोरोनाचे वातावरण निवळले आहे. राज्यभरातून वारकरी नाथषष्ठीसाठी पायी दिंड्या घेऊन निघाले आहेत. आता प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये.
- ह.भ.प. विठ्ठलशास्री चनघटे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, औरंगाबाद.

यात्रा रद्द केल्यास वारकऱ्यांत रोष निर्माण होईल
देशभरात सर्वकाही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी नाथषष्ठी यात्रेसाठी येणारच आहेत. वारकरी आता काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रशासनाने यात्रा रद्द केल्यास वारकरी संप्रदायात मोठा रोष निर्माण होईल.
-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना, पंढरपूर.

Web Title: Dindi marches to Paithan from all over the state without waiting for the government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.