स.भु. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी दिनेश वकील, उपाध्यक्षपदी सुहास बर्दापूरकर
By राम शिनगारे | Published: December 1, 2023 09:47 PM2023-12-01T21:47:08+5:302023-12-01T21:47:52+5:30
विश्वस्तांमध्ये श्रीरंग देशपांडे यांना सर्वाधिक मते
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वांत जुनी शिक्षण संस्था श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ॲड.दिनेश वकील यांनी अध्यक्षपदी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी डॉ.नंदकुमार उकडगावकर यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी डॉ.सुहास बर्दापूरकर यांनी बाजी मारत ओमप्रकाश राठी यांचा पराभव केला. सर्वसाधारण गटात डॉ.श्रीरंग देशपांडे यांनी सर्वाधिक ५७ पैकी ५२ मते घेत विजय मिळविला.
स.भु. शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक नियामक मंडळासाठी शुक्रवारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात मतदान झाले. ६४ पैकी ५७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केली. अध्यक्षपदासाठी ॲड.दिनेश वकील यांना ५७ पैकी ३६ मते, तर डॉ.नंदकुमार उकडगावकर यांना २१ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी डॉ.सुहास बर्दापूरकर यांना ३० मते, तर ओमप्रकाश राठी यांना २७ मते मिळाली. आश्रयदाता गटात प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर यांना ३४ मते, तर प्रतिस्पर्धी डॉ.अजित भागवत यांना २३ मते मिळाली. हितचिंतक गटात प्रवीण मंडलिक यांनी २८ मते, तर प्रसाद कोकिळ यांनी २७ मते मिळविली. दोन मते बाद ठरली.
सर्वसाधारण गटात ११ जण विजयी
संस्थेच्या सर्वसाधारण गटात १६ उमेदवारांपैकी ११ जण विजयी झाले. त्यात डॉ.श्रीरंग देशपांडे यांना सर्वाधिक ५२ मते मिळाली. त्याशिवाय डॉ.रश्मी बोरीकर ४९, अमोल भाले ४०, रमेश जोशी ४०, डॉ.बाळकृष्ण क्षीरसागर ३८, डॉ.मिलिंद कोनार्डे ३७, प्रमोद माने ३६, डॉ.साधना शाह ३६, मिलिंद रानडे ३५, डॉ.योगेश इंगळे ३४ आणि डॉ.रामेश्वर तोतला यांनी ३४ मते घेत विजय संपादन केला, तर रामचंद्र मेढेकर २६, गौतम देशमुख २५, माधव उर्फ रमेश गुमास्ते २५, प्रा.सुहास पानसे २५ आणि विजय सांगवीकर यांना १२ मते पडली.