ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष
By मुजीब देवणीकर | Published: August 10, 2024 08:10 PM2024-08-10T20:10:39+5:302024-08-10T20:10:59+5:30
सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली.
छत्रपती संभाजीनगर : पवित्र हज यात्रेला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाने सोमवारी २०२५-२६ या वर्षासाठी हज धोरण निश्चित केले. त्यामध्ये पूर्वी ७० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही ‘लकी ड्रॉ’ला सामोरे न जाता यात्रेला जाता येत होते. या प्रवर्गात आता वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात आली. त्यांच्यासोबत कम्पेनियन म्हणून जाणाऱ्या नातेवाइकांचे वय आता १८ ते ६० पेक्षा जास्त नसावे, असे म्हटले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली. हज कमिटीला ७० टक्के, तर खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांना ३० टक्के कोटा निश्चित करण्यात आला. मागील वर्षी हा कोटा हज कमिटीला ८० टक्के, तर खासगी टूर्सला २० टक्के होता. महाराष्ट्रातून यंदा १० हजार भाविक हजला रवाना होतील. हज यात्रेच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ हज पिलग्रीम सोशल वर्करचे महासचिव शेख फैसल यांनी दिली.
तीन शहरांतून यात्रेकरू होणार रवाना
१५० हज यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी शासनाकडून एक खिदमतगार म्हणून शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक केली जात होती. आता या खिदमतगारला स्टेट हज क्लेक्टर, असे संबोधले जाईल. महाराष्ट्रातून तीन ठिकाणांहून हज यात्रेकरू रवाना होतील. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी सोय असेल. संभाजीनगरहून जाणाऱ्यांना एका प्रवाशामागे किमान ८० हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
६३ वर्षांची पत्नी असेल तर...
केंद्राने नवीन हज धोरणात ज्येष्ठ नागरिकांना थेट यात्रेला जाण्यासाठी वयोमर्यादा घटविली. सोबतच त्यांच्या नातेवाइकाचे वयही घटविले. यात्रेकरूची बायको ६३ वर्षांची असेल, तर तिला सोबत नेता येणार नाही. मुलगा, सुनेला नेता येईल. १८ ते ६० या प्रवर्गात बायको न बसल्यास पंचाईत होईल, असे अनेक भाविकांचे म्हणणे असल्याचे फैसल शेख यांनी सांगितले.