जमीनमोजणीसाठी थेट सॅटेलाइटची मदत; ‘रोव्हर’द्वारे होतेय अचूक अन् झटपट मोजणी!
By विजय सरवदे | Published: July 31, 2023 12:52 PM2023-07-31T12:52:10+5:302023-07-31T12:53:54+5:30
रोव्हरचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीनमोजणीसाठी आलेल्या शेकडो अर्जांचा ढीग लागायचा. कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अर्जांची संख्या वाढतच होती. आता ‘रोव्हर’ या उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीनमोजणी होत असल्यामुळे शेतकरी, नागरिकांचा वेळ वाचत आहे. मोजणीसाठी अतितातडीचे शुल्क भरले तरी दोन महिने लागायचे, साधे शुल्क भरले तर तीन महिने लागायचे. आता साधे शुल्क भरणाऱ्यास एक ते दीड तर अतितातडीच्या मोजणीसाठी एक महिना लागत आहे.
काय आहे रोव्हर?
रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑब्जेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर घेऊन शेतात मोजणीसाठी जाता येईल, असे ते साधन आहे.
अचूक आणि झटपट मोजणी
रोव्हरद्वारे १ हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ ३० मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. अचूक आणि झटपट मोजणी या यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
तीन महिन्यांत दोन हजार प्रकरणे निकाली
जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी रोव्हरच्या साहाय्याने जमीनमोजणीचे काम सुरू झाले आहे. तीन महिन्यांत सुमारे दोन हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. शहरात आठ रोव्हर आहेत; तर तालुक्याच्या ठिकाणी दोन ते तीन रोव्हर देण्यात आले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती प्रकरणे निकाली?
तालुका................ निकाली प्रकरणे
औरंगाबाद... १३७७
फुलंब्री...... ९०
पैठण.... ७०
सोयगाव... ८०
सिल्लोड..... ६३
कन्नड.... ८८
गंगापूर.... ९५
खुलताबाद.... ४८
वैजापूर..... ८९
अर्ज केल्यावर तीन महिने लागायचे
रोव्हरपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी तीन महिने लागायचे. आता महिन्याभरात मोजणी होऊन शेतकऱ्यांच्या हाती नकाशा पडणे शक्य झाले आहे. तातडीचे शुल्क भरून देखील शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.
जिल्ह्यात ४१ भूमापक....
जिल्ह्यात नऊ भूमी अभिलेख कार्यालय आहेत. शहर कार्यालयात १७ भूमापक आहेत; तर जिल्ह्यातील आठ कार्यालयांत सुमारे २४ भूमापक आहेत. १३७३ गावांतून येणाऱ्या अर्जांसाठी ही यंत्रणा काम करते.
अचूक मोजणी होत आहे
अक्षांश, रेखांशांसह सॅटेलाइटशी कनेक्ट आहे. जिल्ह्यात दोन स्टेशन आहेत. जर नैसर्गिक आपत्तीने जमिनीच्या मार्किंग गेल्या तरी रोव्हरच्या आधारे पुन्हा सर्व मार्किंग जुळविणे शक्य होणार आहे. जमिनी कॉर्डिनेशनचा डाटा रोव्हरमुळे संकलित होणार आहे. कमी वेळेत अचूक मोजणी होते.
-नीलेश उंडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख