चार वर्षांपासून संचालकांचा कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:05 AM2021-06-18T04:05:36+5:302021-06-18T04:05:36+5:30
वैजापूर : बाजार समितीच्या संचालक मंडळात मागील चार वर्षांपासून सातत्याने वाद सुरू असल्याने हे संचालक मंडळ तालुक्यात सतत चर्चेचा ...
वैजापूर : बाजार समितीच्या संचालक मंडळात मागील चार वर्षांपासून सातत्याने वाद सुरू असल्याने हे संचालक मंडळ तालुक्यात सतत चर्चेचा विषय ठरले आहे. संचालक या ना त्या कारणावरून सहकार विभागाकडे तक्रारी करीत आहेत. भिन्न विचाराच्या लोकांनी सत्तेसाठी डाव मांडला. मात्र, चार वर्षांपासून त्यांच्यातील वाद कायमच चव्हाट्यावर आला आहे. तब्बल तीन वेळा अविश्वास ठराव आणला गेल्याने हे मंडळ चर्चेचा विषय ठरला आहे.
माजी आमदार आर. एम. वाणी व दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी बाजार समितीची निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने युती करून रण फुंकले. अटीतटीच्या सामन्यात वाणी-बाबा यांच्या पॅनलने बाजी घेत १८ पैकी १० जागेवर विजय मिळवित बाजार समितीची सत्ता काबीज केली. रामकृष्ण बाबांचे पुत्र काकासाहेब पाटील हे सभापतीपदी विराजमान झाले. एक वर्षाची मुदत संपूनदेखील काकासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याने शिवसेनेने विरोध करून दोन वेळा संचालकांनी अविश्वास ठराव आणून पाटील यांना पायउतार केले.
त्यानंतर शिवसेना, काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने एकत्र येत सभापती व उपसभापती पदे मिळवली. त्यांनीही दोन्ही पदे एक-एक वर्षासाठी वाटून घेतले. मात्र, तरी देखील या मंडळात सर्व काही आलबेल झाले असे घडलेच नाही. भिन्न विचाराचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्याने चार वर्षांपासून ते कायमच वादात राहिले आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या पाठिंब्यावर सभापतीपदी विराजमान झालेले सेनेचे संजय निकम यांनीही एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला.
----
चौकट
सहकार मंत्र्यांनी ठरविले अपात्र
मर्चंट बॅंकेचे थकबाकीदार असल्याने सभापती तथा संचालक संजय निकम यांना टुणकी सोसायटी संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी संचालक काकासाहेब पाटील व माजी संचालक कचरू पठारे यांनी सहकार विभागाकडे केली होती. त्यानुसार संजय निकम यांना सहायक निबंधकांनी अपात्र ठरविले. संजय निकम यांनी निकालाविरोधात विभागीय सहनिबंधक व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले होते. मात्र बाळासाहेब पाटील यांनी सहायक निबंधक यांचा निकाल कायम ठेवल्याने संजय निकम अपात्र ठरले आहे.
----
अशा आहेत तक्रारी :
१) बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील हे रामकृष्ण उपसा योजनेचे थकबाकीदार असल्याने दहेगाव सोसायटीचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी संजय निकम यांनी केलेली आहे.
२) जरूळ सोसायटीच्या संचालिका मीराबाई मतसागर, ग्रा. पं. सदस्य करणारे रिखब पाटणी, राजेंद्र कराळे यांना संचालक पदावरून कमी करावे. तसेच सभापती भागीनाथ मगर यांच्या कुटुंबातील सदस्य व्यापारी असल्याने त्यांना अपात्र ठरवा, अशी मागणी मनोज गावडे यांनी सहकार विभागाला केली.
३) याच संचालक मंडळाच्या २०१६-२०१७ व २०१७-२०१८ या वार्षिक कालावधीत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे खासगी लेखा परीक्षणात उघड झाल्याचे समोर आले.