दिग्दर्शकाला सामाजिक प्रश्नांचं भान असावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:48 PM2017-08-30T23:48:34+5:302017-08-30T23:48:34+5:30
ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शकांनी करावे, असे मत दिग्दर्शक संतोष राम यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शकांनी करावे, असे मत दिग्दर्शक संतोष राम यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष राम परभणीत आले होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
दिग्दर्शनाकडे कसे वळालात? या थेट प्रश्नावर संतोष राम म्हणाले, मी मूळचा उदगीरचा. आमच्याकडे चित्रपट करणारा म्हटलं की वाया गेलेला, अशी धारणा होती. बाल वयापासून चित्रपट पाहण्याची आवड. पुढे एफटीआयमध्ये (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) प्रवेश घेण्यासाठी गेलो; परंतु, प्रवेश मिळाला नाही़ मात्र चित्रपट करायचे हे ध्येय समोर ठेवून अनेक प्रशिक्षणे केली़ पंडित सत्यदेव दुबे हे त्यातील प्रमुख नाव़ आशय फिल्म क्लबच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले व त्यानंतर १६ प्रोजेक्टमध्ये सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले़ या काळात नामांकीत दिग्दर्शकांसमवेत काम करण्याची संधी मिळाली़ एका प्रश्नाच्या उत्तरात संतोष राम म्हणाले, शिक्षण आणि फिल्म या सारख्याच गोष्टी आहेत़ प्रत्येक दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर चित्रपट रुपाने जातो़ ती त्याची परीक्षाच असते़ त्यासाठी नवोदितांनी जागतिक चित्रपटांबरोबरच कला चित्रपटही पाहिले पाहिजेत़
वर्तुळ आणि गल्ली या लघुपटांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल? असे विचारले असता संतोष राम म्हणाले, वर्तुळ या लघुपटाची कथा माझीच आहे़ याच कथाबिजाला चित्रपटाच्या माध्यमातून साकारलं़ गल्ली लघुपटातून जगण्यातील काँट्रॉस एका नवीन शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला़ या लघुपटांना जगभरात ५६ फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात आले़ वर्तुळला १३ तर गल्लीला १२ पुरस्कार मिळाले़