शासकीय कार्यालय इमारत परिसरात घाण अन् झाडा झुडपांचे साम्राज्य

By Admin | Published: June 16, 2014 12:20 AM2014-06-16T00:20:02+5:302014-06-16T01:16:38+5:30

उमरगा : नागरी स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या येथील विविध शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य, काटेरी झाडा झुडपांची वाढ यामुळे शहरातील शासकीय इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

Dirt and Shrub Kingdoms Empire in the Government Office Building | शासकीय कार्यालय इमारत परिसरात घाण अन् झाडा झुडपांचे साम्राज्य

शासकीय कार्यालय इमारत परिसरात घाण अन् झाडा झुडपांचे साम्राज्य

googlenewsNext

उमरगा : नागरी स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या येथील विविध शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य, काटेरी झाडा झुडपांची वाढ यामुळे शहरातील शासकीय इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
१५ जून रोजी रविवारी शहरातील विविध शासकीय इमारत कार्यालयाची पाहणी केली असता, शासकीय कार्यालयाच्या इमारती काटेरी झाडे झुडपे परिसरातील स्वच्छतेचा अभाव या विविध समस्यांच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून आले. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कर्मचारी वसाहत परिसरातील खुल्या जागेत साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या परिसरात काटेरी झाडा झुडपांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. येथील वन परिक्षेत्र कार्यालय परिसराचीही दुरवस्था झाली आहे. येथील जि. प. च्या लघु पाटबंधारे इमारतीत काटेरी झाडांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. इमारती शेजारी कधी काळी उभी केलेली जीप व रोलर ही दोन वाहने अनेक वर्षापासून कुजत पडलेली आहेत. या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या जि. प. सार्वजनिक बांधकाम इमारत कार्यालयाच्या इमारतीशेजारी कधी काळी ठेवलेले डांबराचे बॅरेल इमारतीच्या अस्वच्छतेत भर घालत आहेत. संबंधितांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
येथील पशुवैद्यकीय रुग्णालय परिसराची दुरवस्था झाली आहे. पं. स. सभापती निवासस्थान परिसराची गेल्या अनेक दिवसापासून स्वच्छता करण्यात आली नसल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, निवास स्थान वापराविना पडून आहे. बालकांच्या विकासाची सेवा करण्यासाठी कार्यरत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला अपुऱ्या जागेत संपूर्ण तालुक्याचा कारभार सांभाळावा लागत आहे. एकेकाळी शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी बांधलेल्या या वर्ग खोल्यात या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. पं. स. इमारत परिसराला झाडा-झुडपांनी वेढले आहे. परिसरातील खुल्या जागेत मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. इमारत परिसरातील स्वच्छतागृह वापराविना बंद आहेत. येथील सा.बां. विभागाच्या कार्यालयीन इमारतीमध्ये काटेरी झाडांची वाढ झालेली आहे. कार्यालयीन गोडाऊन इमारतीसमोर टाकण्यात आलेले माती-दगडाचे ढीग परिसरात अवकळा आणण्यासाठी पोषक ठरत आहेत. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची अनेक वर्षापासून साफसफाई झालेली नाही.त्यामुळे हा परिसरही काटेरी झुडपासोबतच पाला-पाचोळ्यांनी व्यापला आहे. (वार्ताहर)
कागदपत्रांचा झाला उकिरडा
येथील तहसील कार्यालयाच्या सेतुसुविधा केंद्राच्या बाजुला असलेल्या दोन खोल्यामध्ये कधी एकेकाळी शासकीय कागदपत्रांचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. या खोल्यातील कागदाचे ढिगारे सर्वत्र विखुरली आहेत. येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या इमारत परिसरातही काटेरी झाडे व झुडपे वाढली आहेत. या कार्यालयाच्या परिसरात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे वापराविना धूळखात पडून आहेत. या इमारतीच्या परिसरात मोकाट जनावरांना मोठा वावर आहे. त्यामुळे शाळकरी मुलांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
‘पाटबंधारे’ परिसरातही झाडेझुडपे
पाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरण विभाग व उपविभाग कार्यालय इमारतीचा परिसर काटेरी झाडा झुडपांची व्यापून गेला आहे. या भागात वन्य प्राण्यांचाही वावर असल्याचे पंडित शिंदगावे यांनी सांगितले. शहरातील तालुका कृषी कार्यालय सहायक निबंधक सहकारी संस्था, दुय्यम निबंधक कार्यालय, दारूबंदी, महावितरण, तालुका कृषी, भूपान आदी कार्यालयात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. भूकंप पुनर्वसन कालावधी दरम्यान लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली निवासस्थानेही वापराविना धूळ खात पडून आहेत. शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात सार्वजनिक स्वच्छतेसाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
भूकंप पुनर्वसन कार्यालय गोदामाची इमारतही धूळ खात
१९९३ साली येथील दत्त मंदिर परिसरात भूकंप पुनर्वसनासाठी शासकीय कार्यालये व निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. भूकंप पुनर्वसन कार्यालय गोडाऊन इमारत गेल्या अनेक वर्षापासून वापराविना धूळ खात पडून असल्याने या गोडाऊनच्या परिसरात गोडाऊनच्या उंचीची झाडे आल्याने या गोडाऊनची दुरवस्था झाली आहे. काटेरी झाडांचा व गाजर गवताचा विळखा वाढल्याने येथे वन्य प्राण्यांचा संचार असल्याचेही बोलले जाते. येथील दत्त मंदिर कार्यालयीन कर्मचारी वसाहतीच्या घराची दुरवस्था झाली आहे. कधी एकेकाळी उभारण्यात आलेली ही निवासस्थाने खिळखिळी झाली आहेत.

Web Title: Dirt and Shrub Kingdoms Empire in the Government Office Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.