पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा केला खून; ती मदतीची याचना करत होती, जमाव फक्त पाहत राहीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:35 AM2024-06-13T11:35:06+5:302024-06-13T11:35:52+5:30

आरोपी भावंड जेरबंद, एका आरोपीने अवघ्या बाराव्या वर्षीच केले होते ब्लेडने वार

disabled husband killed in front of his wife; As she pleaded for help, the crowd just watched | पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा केला खून; ती मदतीची याचना करत होती, जमाव फक्त पाहत राहीला

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा केला खून; ती मदतीची याचना करत होती, जमाव फक्त पाहत राहीला

वाळूज महानगर : पान खरेदी करूनही पानाचे पैसे देत नसल्याने पान टपरी चालकासोबत झालेल्या वादातून दोघा भावंडांनी चाकूने हल्ला करून टपरीचालक सुनील श्रीराम राठोड (४१ रा. शिवनेरी कॉलनी रांजणगाव) यांचा खून केल्याची खळबळजनक घटना रांजणगावात ११ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवाजी ऊर्फ शिवा प्रकाश दुधमोगरे (२२) व त्याचा भाऊ पवन प्रकाश दुधमोगरे (२४, रा. रांजणगाव) यांना जेरबंद केले. मूळ गंधारी ता. लोणार जि. बुलढाणा येथील सुनील राठोड हे पत्नी योगिता (३९ वर्षे), मुलगी प्रिया (८ वर्षे) आणि मुलगा युवराज (१७ वर्षे) यांच्यासह रांजणगाव शेणपूंजी येथे मागील ९ वर्षांपासून राहत होते. राठोड यांना एका डोळ्याने दिसत नसल्याने ते कंपनीत काम न करता रांजणगावातील मच्छी मार्केटलगत पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी पत्नी योगिता आणि मुलगा युवराज दोघेही खासगी कंपनीत काम करत होते. मंगळवारी युवराज कंपनीत कामावर गेल्याने घरी योगीता व मुलगी प्रिया दोघीच होत्या. योगीता यांच्या मोबाइलवर रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास राठोड यांनी फोन करून आपल्या पान टपरीवर आलेले दोन ते तीन मुलं धिंगाणा घालून टपरीतील सामानाची नासधूस करत आहेत. शिवाय चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याने पत्नी योगिता यांनी मुलीला सोबत घेऊन घरापासून काही अंतरावर असणाऱ्या टपरीच्या दिशेने धाव घेतली.

पत्नीच्या डोळ्यादेखत खून, जमाव फक्त पाहत राहिला
मुलीसह आलेल्या योगिताने पान टपरीवर शिवाजी ऊर्फ शिवा आणि पवन पती सुनील यांना शिवीगाळ करत सामानाची नासधूस करत असल्याचे पाहिले. त्यावर योगिता यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनासुद्धा पवनने हातावर लाकडी दांडा मारून जखमी केले. तर सुनील यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शिवाने टपरीतून बाहेर ओढत रस्त्यावर आणून सोबत असणारा चाकू काढून सुनील यांच्या गळ्यावर, पोटात चाकूने घाव केले. सुनील यांच्या गळ्यावरील घाव खोलपर्यंत लागल्याने ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. बेशुद्धावस्थेत असणाऱ्या सुनील यांनी त्यानंतर डोळे उघडलेच नाहीत. पत्नीच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत असताना हतबल पत्नीच्या मदतीला शेकडो बघ्यांच्या गर्दीतून एकही जण पुढे आला नाही, हे येथे उल्लेखनीय. 

फरार आरोपी दोन तासांत जेरबंद
घटनेनंतर दोन्ही भाऊ घटनास्थळावरून पसार झाले होते. शिवाला पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले. तर, अंधारात दडून बसलेल्या पवनला खबऱ्याकडून माहिती मिळताच अवघ्या दोन तासांनी रांजणगावातून ताब्यात घेऊन जेरबंद केले.

भाई म्हणून वावरत होता, बाराव्या वर्षी पहिला गुन्हा गुन्हा दाखल
‘शिवा रेड्डी’ नावाने असणाऱ्या इन्स्टाग्राम सोशल मीडियावर आरोपी शिवा गांजा, दारू आदींची नशा करतेवेळी शिवाय हातामध्ये धारदार शस्त्रे घेऊन अनेक रिल्स बनवलेल्या दिसतात. धक्कादायक म्हणजे जि. प. रांजणगाव शाळेमध्ये इयत्ता सातवीत शिकत असताना किरकोळ भांडणातून शिवाने वर्गातील मुलावर धारदार ब्लेडने वार करत जखमी केले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच त्याची ‘बाल सुधारगृहात’ रवानगी झाली होती. परंतु, त्याच्या वर्तनात सुधारणा न होता तो दिवसेंदिवस अधिक गुन्हे करू लागला. त्याच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात लूटमारी, धमकावणे, मारामाऱ्या, नशा करणे आदींचे पाच, तर त्याचा भाऊ पवन विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. आपल्याला काहीतरी मोठ्ठे कांड करायचे आहे, असे तो सोबतच्या मित्रांना नेहमीच बोलून दाखवायचा. त्याच्या संपर्कात इतरही ८ ते १० तरूण आहेत. स्वत:ची गँग तयार करण्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवा आणि पवन यांच्यासह त्यांच्या नशेखोर मित्रांवर पोलिस प्रशासनाकडून वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली तर निश्चतच मोठे गुन्हे घडणार नाहीत, असा सूर नागरिकांतून उमटत आहे. राठोड यांच्या टपरीवरून नियमित फुकटात सिगारेट, पान घेणाऱ्या दोघा भावंडांविरोधात मागील चार महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी त्यावेळीच कठोर कारवाई केली असती तर आज मोठी घटना घडली नसती, असा संताप मृत राठोड यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

आरोपींना पोलिस कोठडी
आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक राजूरकर हे करत आहेत.

Web Title: disabled husband killed in front of his wife; As she pleaded for help, the crowd just watched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.