केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:06+5:302021-05-14T04:05:06+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासकांच्या आदेशाची यंत्रणेकडून पायमल्ली झाली आहे. लसीकरण केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था ...
औरंगाबाद : महापालिका प्रशासकांच्या आदेशाची यंत्रणेकडून पायमल्ली झाली आहे. लसीकरण केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले होते. परंतु, बहुतेक केंद्रांवर या सुविधा अद्याप देण्यात आलेल्या नाहीत, असे चित्र आहे.
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरणाबाबत लेखी आदेश काढून सर्व अधिकाऱ्यांना विविध कामांची जबाबदारी वाटून दिली.
अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता तथा नोडल ऑफिसर, उपायुक्त तथा टास्क फोर्स प्रमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे आदेशाची प्रत देण्यात आली. महापालिकेच्या ११५ प्रभागांमध्ये मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या नियुक्तीची जबाबदारी कामगार अधिकाऱ्यांवर तर टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी उपायुक्तांवर आदेशानुसार देण्यात आली आहे. लसीकरण सत्रांच्या ठिकाणी चहा व बिस्कीट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रात पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, पन्नास खुर्च्या, आवश्यकतेनुसार मंडप व इतर सुविधांची जबाबदारीही वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशासकांनी काढलेल्या या आदेशानुसार काही ठिकाणी मंडपाची व्यवस्था आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना उन्हातच उभे राहावे लागले आहे.
अनेक ठिकाणी नागरिक उन्हात
एमआयटी कॉलेजमधील वर्गखोल्या, बेंच वापरले जात आहेत. शिवाजीनगर, सादातनगर येथील केंद्रात तर नागरिकांना उन्हातच उभे राहावे लागते. नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही. बन्सीलालनगर आरोग्य केंद्रात नागरिकांना उन्हातच उभे राहावे लागते. नेहरुनगर, मध्यवर्ती जकात नाक्याजवळील लसीकरण केंद्रातही अशीच स्थिती आहे.