तांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा; घरमालकाच्या नावावर भाडेकरूने परस्पर उचलले लाखो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:28 PM2021-07-17T16:28:00+5:302021-07-17T16:28:37+5:30
Cyber crime in Aurangabad ऑनलाईन व्यवहार येत नसल्याने ऑनलाईन वस्तू मागवण्याच्या निमित्ताने मिळवली माहिती
औरंगाबाद : घरमालकाच्या तांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावर विविध प्रकारचा ऑनलाईन व्यवहार करणारा, घरमालकाच्या नावावर बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज उचलून ते आपल्या खात्यात वळते करणारा भाडेकरू मनोज चंद्रकांत फडके याने केलेल्या गुन्ह्याचा तपास करून दोन महिन्यांत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी नुकतेच पोलिसांना दिले.
रमेश मिश्रा हे सातारा परिसरातील अलोक नगरात राहतात. त्यांच्या घरात मनोज फडके सपत्नीक किरायाने राहायला आला होता. मिश्रा यांना ऑनलाईन व्यवहार येत नसल्याने ऑनलाईन वस्तू मागवण्याच्या निमित्ताने फडके याने मिश्रा यांच्या मोबाईलचा, बँक अकाऊंटचा, क्रेडिट कार्ड आदींचा वापर सुरू केला. त्याने एक लाख ५९ हजार रुपये परस्पर त्याच्या खात्यात वळते केल्याचे लक्षात आल्यानंतर मिश्रा यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दिली. फडके याने बनावट दस्तऐवज तयार करून मिश्रा यांच्या नावाने कर्ज घेऊन ऑनलाईन टॅबलेट खरेदी केला. परस्पर डिमॅट खाते उघडले, बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन परस्पर ऑनलाईन शेअरचा व्यवहार केला, पुन्हा ४ लाख २५ हजाराचे कर्ज उचलून त्यापैकी २ लाख ३३ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवले. सॅमकोच्या डिमॅट अकाऊंटवर एक लाख ३७ हजार रूपये हस्तांतरित केले. हा सर्व प्रकार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेने शोधून काढल्यानंतर हा गुन्हा सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्ग केला. पोलिसांनी ठाण्यात बोलावले तेव्हा फडके याने गुन्हा कबूल केला. परंतु, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी फडके हे हिशेब करून पैसे परत देण्यास तयार आहे, असे पत्र दिले. काही तक्रार असल्यास न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. याचा गैरफायदा उचलून फडके पळून गेला.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही
मिश्रा यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. परंतु, त्याची दखल न घेतली गेल्याने मिश्रा यांनी अॅड. रामनाथ चोभे यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. सुनावणीच्या वेळी अॅड. चोभे यांनी या बाबी निदर्शनास आणून दिल्या. सुनावणीअंती न्यायदंडाधिकारी पाटील यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले.