मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

By बापू सोळुंके | Published: October 28, 2023 02:03 PM2023-10-28T14:03:46+5:302023-10-28T14:04:43+5:30

हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याला करावी लागत आहे प्रतीक्षा

Disagreement among officials of water resources department over release of water for Marathwada | मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे, यासाठी विविध सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र मराठवाड्यासाठी गोदापात्रात किती पाणी सोडावे, यावरून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आकडेवारीवरून मतभेद असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४६ टक्के जलसाठा आहे. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसात्दि. १५ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून दि. ३१ ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना आहेत. यामुळे याविषयी तत्काळ निर्णय होेणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांकडून काढण्यात आले नाही. याविषयी सूत्रांनी सांगितले की, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून गाेदापात्रात पाणी सोडल्यापासून जायकवाडी प्रकल्पात पाणी पाेहोचेपर्यंत सुमारे ३० टक्के पाण्याचा लॉस होतो असे गृहित धरण्यात येते. यानुसार जायकवाडी प्रकल्पात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, यासाठी साडेबारा टीएमसी पाणी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन करावे, असा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला, तर या प्रकल्पात साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, याकरिता ११ टीएमसी पाणी जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणातून सोडावे, असा प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकडेवारीवर एकमत होत नसल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणी हक्क परिषदेचा सवाल
मराठवाडा पाणी हक्क परिषदेने आज दि. २७ ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन आजपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्याने समन्यायी पाणी वाटप तत्त्वाची अंमलबजावणी कशी होईल? असा सवाल केला. या निवेदनावर जलसंपदाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. शंकर नागरे, जयसिंह हिरे, डॉ. सजेराव ठोंबरे, नरहरी शिवपुरे आणि मनोहर सरोदे यांची नावे आहेत.

सेामवारी कालवा सल्लागार समितीची बैठक
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी होत आहे. या बैठकीत जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Disagreement among officials of water resources department over release of water for Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.