कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद
By विकास राऊत | Published: August 8, 2024 02:37 PM2024-08-08T14:37:37+5:302024-08-08T14:40:01+5:30
कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी सरळ सेवा भरतीने भरण्यावरून चार कुलगुरू आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मतभेद असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना करूनही कुलगुरूंनी मंत्र्यांना दाद न दिल्याने कृषिमंत्री मुंडे यांनी पदोन्नतीच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आबीटकर यांना बुधवारी पत्र दिले.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीबाबत निवड समितीच्या दोन बैठका कृषिमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली २९ व ३० जुलै दरम्यान झाल्या. त्यात केवळ प्राध्यापक पदांचा विचार झाला. परंतु विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव कृषी परिषदेने मान्यतेसाठी ठेवूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. तो विषय स्थगित ठेवण्यात आला.
सोशल मीडियातून टीका
कृषी विद्यापीठामध्ये सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख ही पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के सरळसेवा भरतीने भरावीत, असा शासनाचा नियम आहे. आता जी पदे भरायची आहेत, ते मागासवर्गीय आहेत. त्यामुळे ही पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी कुलगुरू एकवटल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.
चार विद्यापीठांत सुमारे १०० प्रकरणे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठांत सुमारे १०० पदोन्नतीचे प्रस्ताव आहेत. ही सगळी पदे मागासवर्गीय असल्याची चर्चा आहे. सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचे मीम्स सोशल मीडियातून येत असल्यामुळे कृषिमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत, सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.
तातडीने निर्णय घेण्यासाठी मुंडे यांचे पत्र
पदोन्नती रखडल्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठांवर अन्याय होत असल्याचा संदेश जातो आहे. अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोशल मीडियात कृषी विद्यापीठांबाबत नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.
-धनंजय मुंडे, कृषी मंत्री
( ७ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यक्षांना दिलेले पत्र )
सरळसेवा भरतीतून मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतील
पदोन्नती ऐवजी सरळसेवा भरती केली तर मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतील. पूर्ण देशात ही पदे सरळसेवा भरतीने भरली जातात. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये हाच नियम आहे. मेरिट हवे असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. मंत्र्यांची जी भावना आहे, त्याबाबत सेवा प्रवेश मंडळ बैठक घेऊन चर्चा करेल. महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ राष्ट्रीय पातळीवर जावेत, त्यासाठी मेरिटवर चांगले उमेदवार येतील, अशी माझी भावना आहे. देशात या पदांवर पदोन्नती होत नाही. स्पर्धात्मक निवड राज्यात व्हावी ही अपेक्षा आहे. सेवा मंडळाचे अध्यक्ष आबीटकर यांची समिती यावर निर्णय घेईल.
-डॉ. इंद्रमणी, कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी